
मुंबई , 31 डिसेंबर (हिं.स.)।भारतीय बाजारात हुंडईकडून विविध सेगमेंटमध्ये वाहनांची विक्री केली जाते. मिड-साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये हुंडई क्रेटा ही एसयूव्ही ऑफर करण्यात येते. या एसयूव्हीने अलीकडेच नवा विक्री विक्रम प्रस्थापित केला आहे. उत्पादक कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 2025 मध्ये या वाहनाच्या 2 लाख युनिट्सची विक्री झाली आहे.
हुंडईकडून मिड-साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या हुंडई क्रेटाने नुकताच नवा टप्पा गाठला आहे. उपलब्ध माहितीनुसार, 2025 मध्ये सुमारे 2 लाख युनिट्सची विक्री झाली आहे. याचा अर्थ देशभरात दररोज सरासरी सुमारे 550 क्रेटा एसयूव्हींची विक्री झाली आहे.
हुंडई मोटर इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक तरुण गर्ग यांनी सांगितले की, “भारतामधील हुंडई क्रेटाचा प्रवास अत्यंत उल्लेखनीय राहिला आहे. एका वर्षात 2 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री करणे हा हुंडईसाठी अभिमानाचा आणि निर्णायक क्षण आहे. 2020 ते 2025 या कालावधीत एकत्रितपणे पाहता, क्रेटा ही भारतातील सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही ठरली आहे. भारतात 10 वर्षांच्या प्रवासात क्रेटाचा ग्राहकवर्ग अनेक पटींनी वाढला असून, ही एसयूव्ही आता केवळ सक्षम वाहन न राहता प्रत्येक प्रवासासाठी विश्वासार्ह साथीदार बनली आहे.
ब्रँडची वाढ पहिल्यांदा वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या टक्केवारीतही दिसून येते—2020 मध्ये 13 टक्के असलेली ही संख्या 2025 मध्ये वाढून 32 टक्के झाली आहे. तसेच, सनरूफ असलेल्या व्हेरिएंट्सचा 2025 मधील विक्रीत 70 टक्क्यांहून अधिक वाटा आहे. याशिवाय, डिझेल इंजिनचा वाटा 44 टक्के इतका मजबूत राहिला आहे. क्रेटाला हुंडईच्या विश्वास, नाविन्य आणि बांधिलकीचे प्रतीक बनविणाऱ्या सर्व ग्राहकांचे आणि डीलर भागीदारांचे आम्ही मनापासून आभार मानतो.”
निर्मात्याकडून या एसयूव्हीमध्ये अनेक प्रीमियम आणि आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये 17 इंच अलॉय व्हील्स, एलईडी हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, सिक्वेन्शियल टर्न इंडिकेटर्स, शार्क फिन अँटेना, ड्युअल-टोन एक्स्टिरियर व इंटिरियर, लेदर सीट्स, रिअर विंडो सनशेड, पॅनोरॅमिक सनरूफ, ड्युअल-झोन ऑटोमॅटिक एसी, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, वायरलेस फोन चार्जर, ईको, नॉर्मल आणि स्पोर्ट मोड्स, स्नो, मड आणि सॅंड ट्रॅक्शन मोड्स, क्रूझ कंट्रोल, की-लेस एंट्री, फ्रंट कन्सोल आर्मरेस्टसह स्टोरेज, रिमोट इंजिन स्टार्टसह स्मार्ट की, इलेक्ट्रिक टेलगेट रिलीज, रिअर एसी व्हेंट्स, रिअर वायपर व वॉशर, टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टीअरिंग व्हील, ISG, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, 10.25 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, बोसचे 8-स्पीकर ऑडिओ सिस्टम, अँड्रॉइड ऑटो, अॅपल कारप्ले, 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ब्लूलिंक तंत्रज्ञान, OTA अपडेट्स आणि होम-टू-कारसह अॅलेक्सा सपोर्ट यांचा समावेश आहे.
हुंडई क्रेटा मध्ये तीन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत.यामध्ये 1.5 लिटर नॅचरल अॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन – 115 पीएस पॉवर आणि 143.8 न्यूटन मीटर टॉर्क, 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन – 160 पीएस पॉवर आणि 253 न्यूटन मीटर टॉर्क, 1.5 लिटर डिझेल इंजिन – 116 पीएस पॉवर आणि 250 न्यूटन मीटर टॉर्क यांचा समावेश आहे. यासोबतच एसयूव्हीमध्ये 6-स्पीड मॅन्युअल, IVT, ऑटोमॅटिक आणि 7-स्पीड DCT ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध आहेत. हुंडई क्रेटा ची एक्स-शोरूम सुरुवातीची किंमत 10.73 लाख रुपये असून, टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 20.20 लाख रुपये आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode