
रत्नागिरी, 31 डिसेंबर, (हिं. स.) : येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या नववर्ष स्वागत ठेव योजनेचा प्रारंभ १ जानेवारीपासून सुरू होत असून २०२६ सालचे स्वागत करतानाच स्वरूपानंद ४०० कोटींचा ठेव टप्पा गाठण्याच्या समीप आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले.
अॅड. पटवर्धन म्हणाले, पतसंस्थेत दि.३१ डिसेंबर २०२५ अखेर ३९४ कोटींच्या ठेवी संकलित असून नव्या वर्षाच्या प्रारंभीच ४०० कोटींचा ठेव टप्पा पतसंस्था पूर्ण करेल. पतसंस्थेच्या १७ शाखा ठेवीदारांच्या स्वागतासाठी, नववर्षाच्या शुभकामना देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. विविध ठेव योजना घेऊन ग्राहक, ठेवीदार, सभासदांसाठी विश्वासार्ह, आकर्षक गुंतवणुकीच्या संधी घेऊन पतसंस्थेने नववर्ष स्वागत ठेव योजना घोषित केल्या आहेत.
स्वरूपांजली ठेव योजना १६ ते १८ महिने सर्वसाधारण ८.०० टक्के, ज्येष्ठ नागरिक / महिलांसाठी ८.१० टक्के, सोहम ठेव योजना १९ ते ३६ महिने (मासिक व्याज) सर्वसाधारण ८.१० टक्के व ज्येष्ठ नागरिक / महिला ८.२५ टक्के याप्रमाणे आकर्षक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. महिला व ज्येष्ठ नागरिक यांना अधिकच्या व्याजदर योजना जाहीर केल्या आहेत. एकरकमी ५ लाख किंवा अधिक ठेवीसाठी ८.५० टक्के व्याजदर घोषित केला आहे.
पतसंस्थेचा संमिश्र व्यवसाय ६७९ कोटी रुपयांचा झाला असून संस्थेचा स्वनिधी ५४ कोटी ३९ लाखापर्यंत पोहोचला आहे. भांडवलपर्याप्ततेचे प्रमाण २८ टक्के झाले आहे. सीडी रेशो ६३.१९ टक्के, गुंतवणुका १६९ कोटी ८६ लाख अशी सांपत्तिक स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर नववर्ष स्वागत ठेव योजनेत गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी, असे आवाहन ॲड.पटवर्धन यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी