ट्रेलरमधून ५५० लिटर डिझेल चोरी; दोन अटकेत, एक फरार
रायगड, 4 डिसेंबर, (हिं.स.)। पनवेल परिसरात उभ्या असणाऱ्या दोन ट्रेलरमधून मोठ्या प्रमाणात डिझेल चोरी करणाऱ्या दोघांना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या कडून २७० लिटर चोरीचे डिझेल जप्त करण्यात आले आहे. तिसरा आरोपी मात्र फरार असून त्याचा
ट्रेलरमधून ५५० लिटर डिझेल चोरी; दोन अटकेत, एक फरार


रायगड, 4 डिसेंबर, (हिं.स.)। पनवेल परिसरात उभ्या असणाऱ्या दोन ट्रेलरमधून मोठ्या प्रमाणात डिझेल चोरी करणाऱ्या दोघांना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या कडून २७० लिटर चोरीचे डिझेल जप्त करण्यात आले आहे. तिसरा आरोपी मात्र फरार असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

घटना पनवेलजवळील साईकृपा हॉटेलसमोर घडली. टायर पंचर दुकानाजवळ दोन ट्रेलर उभे असताना आरोपी शाहिद आफ्रिदी नूर मोहम्मद शेख (२४, रा. गोवंडी), मोहम्मद हसनैन दिलशाद शेख (२०, रा. गोवंडी) आणि त्यांचा साथीदार ‘टकल्या’ (नाव अज्ञात) यांनी संगनमत करून दोन्ही वाहनांमधील मिळून सुमारे ५५० लिटर डिझेल चोरी करून ते पसार झाले.

या प्रकरणी ट्रेलर चालक दिलीप जोखू कुमार यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे, हवालदार परेश म्हात्रे, गंथडे, वायकर, दिवेकर, नाईक विनोद देशमुख आणि सम्राट डाकी यांच्या पथकाने गुप्त बातमीदाराच्या मदतीने तुर्भे परिसरात सापळा रचला.

दरम्यान, संशयितांची हालचाल कळताच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान चोरी केलेल्या डिझेलपैकी २७० लिटर डिझेल त्यांच्या ताब्यात सापडले. उर्वरित डिझेल कोठे विकले गेले याबाबत तपास सुरू आहे. फरार आरोपी ‘टकल्या’चा शोध हवालदार परेश म्हात्रे घेत आहेत.

ही चोरीची घटना उघड झाल्यानंतर परिसरातील वाहनचालक आणि ट्रान्सपोर्टर्समध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री उभ्या असणाऱ्या ट्रेलर्सची वाढती चोरी ही गंभीर बाब असल्याचे ट्रकचालकांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande