
पालघर, 4 डिसेंबर, (हिं.स.)। डहाणू तालुक्यातील साबरे येथील साखर आश्रमशाळेजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अज्ञात नवजात अर्भक मृतावस्थेत आढळल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी समोर आली. स्थानिक नागरिकांना अर्भक दिसताच त्यांनी तात्काळ डहाणू पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व पुढील तपासासाठी मृतदेह स्थानिक रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
अर्भकाला जन्मानंतर काही तासांतच किंवा लगेच टाकून दिल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या कृत्यामागील जबाबदार व्यक्तींचा शोध घेण्यासाठी डहाणू पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. संबंधित प्रकरणाची माहिती देताना डहाणू पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण पवार यांनी सांगितले की, अजात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून तपास जोरात सुरू आहे.
गेल्या काही वर्षांत पालघर जिल्ह्यात नवजात शिशूंना सार्वजनिक ठिकाणी किंवा कचऱ्यात टाकून देण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नुकतेच पालघर रेल्वे स्थानक परिसरातही एक दिवसाचे अर्भक आढळले होते. या घटनांमुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL