अमरावतीतील कुख्यात गुन्हेगार फिरोज उर्फ ‘बाली’ काझीवर कारवाई
अमरावती, 4 डिसेंबर (हिं.स.) शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस विभागाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, अमरावतीतील कुख्यात व सातत्याने सक्रिय असलेल्या गुन्हेगारावर एम.पी.डी.ए. (महाराष्ट्र प्रिव्हेंटिव्ह डिटेंशन अॅक्ट) अंतर्गत कारवाई
अमरावतीतील कुख्यात गुन्हेगार फिरोज उर्फ ‘बाली’ काझीवर एमपीडीए कारवाई; आयुक्तांचे आदेश, मध्यवर्ती कारागृहात दाखल


अमरावती, 4 डिसेंबर (हिं.स.)

शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस विभागाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, अमरावतीतील कुख्यात व सातत्याने सक्रिय असलेल्या गुन्हेगारावर एम.पी.डी.ए. (महाराष्ट्र प्रिव्हेंटिव्ह डिटेंशन अॅक्ट) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यानुसार फिरोज काझी उर्फ बाली जहीरोद्दिन काझी (वय 33, रा. इकबाल कॉलनी, अमरावती) यास स्थानबद्धतेचा आदेश जारी करून मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे दाखल करण्यात आले आहे.

फिरोज काझी हा सन 2021 पासून विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय असून त्याच्याविरुद्ध नागपुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये एकूण 08 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यात दुखापत, गंभीर प्रक्षोभ न घडवता हमला करणे, जीवघेणी धमकी देणे, अश्लील कृती, दोन किंवा अधिक व्यक्तींनी समान उद्देशासाठी केलेल्या कृती, शांतता भंग करण्याचा प्रयत्न, फौजदारीपात्र धाकदपट, खंडणी, अंमली पदार्थजवळ बाळगणे, अवैध शस्त्रे बाळगणे व विक्री करणे, हद्दपार आदेशाचे उल्लंघन, तसेच अधिसूचनांचे उल्लंघन अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याच्यावर यापूर्वी अनेक प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या असून त्यास तडीपारही करण्यात आले होते. तरीही तो गुन्हेगारीत सक्रिय राहिल्याने एमपीडीए कारवाईची गरज भासली.

या कारवाईसाठी पोलीस स्टेशन नागपुरी गेट येथील वपोनि हनमंत उरलागोंडावार व पोलीस निरीक्षक जनार्दन साळुंखे यांनी सविस्तर प्रस्ताव तयार करून सपोआ राजेंद्र पाटील (गाडगेनगर विभाग), पोउपआ गणेश शिंदे (परिमंडळ-1) व पोउपआ (मुख्यालय) रमेश धुमाळ यांच्या मार्फत पाठविला. त्याची तपासणी गुन्हे शाखेच्या सपोआ शिवाजी बचाटे, व.पो.नि. श्रीमती सीमा दाताळकर, पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. एमपीडीए सेलमधील सपोनि इम्रान नायकवडे, सहायक पोउपनि अजय मिश्रा, चेतन कराडे तसेच नागपुरी गेट पोलीस स्टेशनचे आनंद ठाकूर व मंगेश बोरकर यांनी प्रस्तावाची संपूर्ण पूर्तता केली.

सदर प्रस्तावावर कार्यवाही करत पोलीस आयुक्त अरविंद चावरीया यांनी दिनांक 03 डिसेंबर 2025 रोजी एमपीडीए स्थानबद्धतेचा आदेश पारित केला. त्यानुसार नागपुरी गेट पोलीस स्टेशनमार्फत आदेशाची अंमलबजावणी करून आरोपीस त्याच दिवशी मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे दाखल करण्यात आले.अमरावती शहर आयुक्तालयाच्या हद्दीत आगामी सण-उत्सव, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांची माहिती संकलित करून त्यांच्यावर विविध कायद्यांतर्गत कडक प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येणार असल्याचे पोलीस विभागाने स्पष्ट केले आहे. शहरातील शांतता व कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर अशीच कठोर पावले उचलली जातील,

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande