
रायगड, 4 डिसेंबर, (हिं.स.)। पनवेलची १२ वर्षीय कराटेपटू अंतरा समीत करांडे हिने राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत नॅशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदकाची कमाई केली आहे. महात्मा इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या अंतराने अल्पवयात मिळवलेले हे यश पनवेलसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
कराटे इंडिया ऑर्गनायझेशनतर्फे आयोजित ही स्पर्धा दिल्लीतील टॉकाटोरा इंडोर स्टेडियम येथे पार पडली. या चॅम्पियनशिपचे वर्ल्ड कराटे फेडरेशन, एशियन कराटे फेडरेशन, कॉमनवेल्थ कराटे फेडरेशन आणि साऊथ एशियन कराटे फेडरेशन यांसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघटनांशी संलग्न असल्यामुळे या स्पर्धेला विशेष महत्व आहे. देशभरातील शेकडो गुणवान खेळाडूंमध्ये झुंज देत अंतराने कौशल्य, शिस्त आणि दमदार तंत्राच्या जोरावर रौप पदक पटकावले.
अंतराच्या अलीकडील कारकिर्दीकडे पाहता, तिने गेल्या दोन महिन्यांत सलग यशाची मालिका साधली आहे. ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक, DSO झोन कराटे चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक, झोन कराटे चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक, वेस्ट झोन कराटे चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक तसेच SGFI (महाराष्ट्र) स्पर्धेत कांस्य पदक अशी चमकदार कामगिरी तिने केली आहे. या सर्व यशामागे NBKC कराटे क्लासचे अध्यक्ष आणि अनुभवी प्रशिक्षक रोहन यादव यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.
अंतराच्या या सलग विजयामुळे पनवेलमध्ये आनंदाचे वातावरण असून, शाळा, पालक, प्रशिक्षक आणि शहरातील क्रीडाप्रेमींनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. लहान वयात एवढ्या मोठ्या प्रमाणावर सातत्यपूर्ण कामगिरी करणारी अंतरा भविष्यकाळात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कराटे क्षेत्रातील एक उज्वल तारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके