नवी मुंबई पोलिसांचे ऑपरेशन क्लीन; १० तृतीयपंथीयांविरुद्ध गुन्हे दाखल
नवी मुंबई, 4 डिसेंबर, (हिं.स.)। नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने उरण फाटा सर्व्हिस रोड आणि कळंबोली स्टील मार्केट परिसरात संयुक्तपणे कारवाई करत दहा तृतीयपंथीयांना ताब्यात घेतले आहे. परिसरात गैरप्रकार, नागरिकांशी गैरवर्तन तसेच सार्वजनिक शिस्त भंग
नवी मुंबई पोलिसांचे ऑपरेशन क्लीन; १० तृतीयपंथीयांविरुद्ध गुन्हे दाखल


नवी मुंबई, 4 डिसेंबर, (हिं.स.)। नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने उरण फाटा सर्व्हिस रोड आणि कळंबोली स्टील मार्केट परिसरात संयुक्तपणे कारवाई करत दहा तृतीयपंथीयांना ताब्यात घेतले आहे. परिसरात गैरप्रकार, नागरिकांशी गैरवर्तन तसेच सार्वजनिक शिस्त भंग केल्याचे आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सहआयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे आणि पोलीस उपआयुक्त (गुन्हे शाखा) सचिन गुंजाळ यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात आली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरण फाटा सर्व्हिस रोड आणि कळंबोली स्टील मार्केट परिसरात काही तृतीयपंथी तोकडे कपडे परिधान करून रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना टाळ्या वाजवून थांबवणे, हातवारे करणे, अश्लील हावभाव करणे अशा स्वरूपाच्या कृती करत असल्याची तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार पथकांनी छापा टाकून उरण फाटा परिसरातून पाच आणि कळंबोली स्टील मार्केट परिसरातून आणखी पाच तृतीयपंथीयांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या सर्वांविरुद्ध सीबीडी पोलीस ठाणे आणि कळंबोली पोलीस ठाणे येथे संबंधित कलमांनुसार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या कारवाईत सहायक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि पृथ्वीराज घोरपडे, सपोनि राजश्री शिंदे, पोउपनिरी सरिता गुडे, पोशि ठाकूर, पोशि चव्हाण, पोशि पारासुर, मपोना अडकमोल, मपोना भोये तसेच पोहवा हांडे यांनी सहभाग घेतला.

परिसरात शिस्त आणि सुरक्षेच्या दृष्टीने अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande