
नाशिक, 4 डिसेंबर, (हिं.स.)। दुकान कामासाठी व्याजासाठी दिलेल्या रकमेची वसुली करूनही एका इसमासह त्याच्या कुटुंबीयांना पिस्तुलाचा धाक दाखवून साडेनऊ लाखांची खंडणी उकळणाऱ्या खासगी सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी साहेबराव नबू शिंदे (रा. देवरगाव, ता. चांदवड) हे व्यापारी आहेत. आरोपी शरद ज्ञानेश्वर घुगे (रा. कोटमगाव, नाशिकरोड) याने ऑक्टोबर २०२३ ते दि. ३ डिसेंबर २०२५ या कालावधीत फिर्यादी शिंदे यांना सायबर फ्रॉडमध्ये अडकलेले पैसे काढून देतो, असे आश्वासन देऊन आरोपी खासगी सावकार घुगे याने फिर्यादींना कोटमगाव येथील राहत्या घरी बोलावले, तसेच त्याच्याकडे कोणतेही सावकारी लायसन नसताना फिर्यादीला दुकान कामाच्या भांडवलासाठी ३ लाख ७० हजार रुपये व्याजाने दिले, तसेच फिर्यादी व त्याच्या कुटुंबीयांना पिस्तुलाचा धाक दाखवून फिर्यादीला दिलेल्या १४ लाख ७० हजार रुपयांच्या व्याजापोटी एकूण २४ लाख २५ हजार रुपये घेऊनही त्यानंतर पुन्हा एकदा ९ लाख ५५ हजार रुपये खंडणीस्वरूपात वसूल केले. नंतर कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादीकडून खंडणी उकळली.
या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात शरद घुगे या खासगी सावकाराविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV