
दहा लाखांचा साठा जप्त, टेम्पो चालकाला अटक
पालघर, 4 डिसेंबर (हिं.स.)।
दमण बनावटीच्या दारूची तस्करी रोखण्यासाठी पोलिस आणि उत्पादन शुल्क विभाग सतत कारवाई करत असतानाही दारू माफिया नवनव्या क्लुप्त्या लढवत असल्याचे वारंवार समोर येते. मात्र मनोर पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बुधवारी दुपारी केलेल्या अचूक कारवाईत चपला आणि बुटांच्या गोण्यांआड लपवून नेली जात असलेली दमण बनावटीच्या विदेशी दारूची मोठी खेप जप्त करण्यात आली. या कारवाईत तब्बल दहा लाख रुपये किमतीचा दारू साठा हस्तगत झाला असून एका टेम्पो चालकाला अटक करण्यात आली आहे.
मुंबई–अहमदाबाद महामार्गावरून मुंबईकडे एका टेम्पोने दारूची तस्करी होणार असल्याची माहिती मनोर पोलिसांना मिळताच नांदगाव उड्डाणपुलाजवळील सम्राट हॉटेलसमोरच्या सर्व्हिस रोडवर सापळा रचण्यात आला. दुपारी सुमारे तीनच्या सुमारास संशयित टेम्पो (क्र. एमएच १८ बीएस ७७००) महामार्गावरून वेगाने जाताना दिसला. तात्काळ पोलिसांनी त्याचा पाठलाग करून वाहन थांबवले.
पंचांच्या उपस्थितीत तपासणी केल्यावर टेम्पोमध्ये वरच्या बाजूला चपला–बुटांच्या गोण्या भरलेल्या दिसल्या. मात्र त्यांच्या खाली पुठ्याच्या बॉक्समध्ये विदेशी दारूचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला. त्यामुळे टेम्पो व दारूचा माल ताब्यात घेण्यात आला.
टेम्पो चालक किशोर भिका बावोसकर (वय ३९, रा. सुर्यानगर झोपडपट्टी, विक्रोळी – मुंबई) याला दारूबंदी अधिनियमानुसार अटक करण्यात आली आहे. पुढील तपास मनोर पोलिसांकडून सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL