जळगाव : सोनसाखळी लांबवणाऱ्या दोन चोरट्यांना अटक
जळगाव, 4 डिसेंबर, (हिं.स.) - शहरात व परिसरात गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या सोनसाखळी लांबवणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना रावेर गुन्हे शोध पथकाने सापळा रचून अटक केली असून रावेर येथील चोरी तसेच कुऱ्हा–काकोडा परिसरातील मागील गुन्ह्याचीही उकल झाली आहे
जळगाव : सोनसाखळी लांबवणाऱ्या दोन चोरट्यांना अटक


जळगाव, 4 डिसेंबर, (हिं.स.) - शहरात व परिसरात गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या सोनसाखळी लांबवणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना रावेर गुन्हे शोध पथकाने सापळा रचून अटक केली असून रावेर येथील चोरी तसेच कुऱ्हा–काकोडा परिसरातील मागील गुन्ह्याचीही उकल झाली आहे. दोघांकडून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, वाघोड येथील शोभाबाई सुरेश पाटील (वय ४७) या कर्जोत फाट्यावरून पायी घरी जात असताना लाल–काळ्या पल्सरवरील दोन युवकांनी पत्ता विचारण्याचा बहाणा केला. क्षणात त्यांच्या चेहऱ्यावर माती फेकत गळ्यातील १० ग्रॅमची सोन्याची पोत खेचून आरोपी पसार झाले.

घटनेनंतर पो.नि. डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने परिसरातील सीसीटीव्ही तपासले. प्रतिमा स्पष्ट नसल्या तरी आरोपींनी शहरात रेकी करून वाघोडच्या दिशेने दुचाकीवरून निघाल्याचे दिसून आले. यावरून तांत्रिक तपास व गुप्तचरांच्या मदतीने अजय गजानन बेलदार (२०) व नरेंद्र उर्फ निलेश अशोक बेलदार (२०), दोघे रा. अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) अशी ओळख पटली.पोलिस पथक अंतुर्ली येथे पोहोचले तेव्हा आरोपी फरार हवेत. मात्र, पथकाने हार न मानता गावाजवळील शेतात तळ ठोकून पहारा बसवला. काही वेळात आरोपी गावात परतल्याची खबर मिळताच, पोलिसांनी झडप घालत नरवेल रोडवर दोघांना ताब्यात घेतले. तपासात दोघांनी ३ नोव्हेंबरला कुऱ्हा–काकोडा बसस्थानकाजवळ १० ग्रॅमची सोनसाखळी चोरल्याची कबुली दिली. गुन्ह्यात वापरलेली ७५ हजारांची पल्सर, तर जप्त केलेल्या सोन्याची किंमत १.७५ लाख रुपये अशी मिळून अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande