
लखनऊ, ४ डिसेंबर (हिं.स.)लखनऊ येथील अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या एलिट ग्रुप अ सामन्यात केरळने मुंबईचा १५ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना केरळने निर्धारित २० षटकांत पाच गडी गमावून १७८ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ १९.४ षटकांत १६३ धावांवर आटोपला आणि १५ धावांनी सामना गमावला. बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या केरळचा क्रिकेटपटू शराफुद्दीनला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. या विजयासह केरळ १२ गुणांसह गट क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला, तर पराभवानंतरही मुंबई १६ गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे.
केरळने ठेवलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली. आयुष म्हात्रे (३) स्वस्तात बाद झाला. त्यानंतर अजिंक्य रहाणे (३२), सरफराज खान (५२) आणि सूर्यकुमार यादव (३२) यांनी मुंबईला सामन्यात टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु एकामागून एक विकेट्स लागल्याने संघाची गती बिघडली. मुंबईचा डाव १९.४ षटकांत १६३ धावांवर आटोपला.
केरळकडून केएम आसिफने शानदार गोलंदाजी करत पाच विकेट्स घेतल्या. विघ्नेश पुथूरने दोन विकेट्स घेतल्या, तर शराफुद्दीन, एमडी निधीश आणि अब्दुल बासिथ यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना केरळने २० षटकांत 5 विकेट्स गमावून १७८ धावा केल्या. संघाचा कर्णधार संजू सॅमसनने २८ चेंडूत ४६ धावांची आक्रमक खेळी केली, तर विष्णू विनोदने नाबाद ४३ धावा करत संघाला सावरले. मोहम्मद अझरुद्दीनने २५ चेंडूत ३२ धावा केल्या. शेवटी, शराफुद्दीनने फक्त १५ चेंडूत नाबाद ३५ धावा करत धावगतीचा वेग वाढवला आणि केरळला एक मजबूत धावसंख्या गाठण्यास मदत केली. मुंबईकडून शार्दुल ठाकूर, अथर्व अंकोलेकर, शम्स मुलाणी, साईराज पाटील आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे