
रत्नागिरी, 5 डिसेंबर, (हिं. स.) : देवरूख येथील ओंकार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात फेरचौकशी अहवालानुसार तत्कालीन व्यवस्थापक वासंती अनिल निकम यांना दोषी ठरविण्यात आले आहे.
यापूर्वी झालेल्या चौकशीत तत्कालीन संचालक मंडळास दोषी ठरवत संस्थेच्या नुकसानीची रक्कम भरावी, असा आदेश दिला होता. हा आदेश संचालक मंडळाने आव्हान दिल्यानंतर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 88 व नियम 1961 चे नियम 72 अन्वये फेरचौकशीचे आदेश देण्यात आले. त्यानुसार राजापूर येथील सहकारी संस्था सहायक निबंधक अविनाश इंगळे यांची प्राधिकृत चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
फेरचौकशी अहवालानुसार संस्थेत एकूण 2,03,27,670 एवढ्या रकमेचा गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले असून त्यासाठी तत्कालीन सचिव व व्यवस्थापक वासंती निकम यांना जबाबदार धरण्यात आले आहे.
गैरव्यवहाराची संपूर्ण रक्कम तसेच गैरव्यवहार झालेल्या तारखेपासून भरणा होईपर्यंत १५ टक्के व्याजासह संबंधित रक्कम संस्थेत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सहायक निबंधकांच्या नोटिशीनुसार वासंती निकम यांना १६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता खुलाशासाठी हजर राहण्याचे निर्देश दिले असून नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत समाधानकारक उत्तर न दिल्यास संस्थेची रक्कम जमीन महसूल थकबाकीप्रमाणे वसूल करण्यात येईल, अशी स्पष्ट ताकीद देण्यात आली आहे.
उपस्थित न राहिल्यास किंवा खुलासा न केल्यास कायद्यानुसार स्थावर मालमत्तेच्या जप्तीची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असे आदेश सहायक निबंधक साहेबराव पाटील यांनी नोटिशीद्वारे दिले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी