
डोंबिवली, 5 डिसेंबर (हिं.स.)। जागतिक जम्प रोप (दोरीच्या उड्या) स्पर्धेत अनेक मेडल्स मिळवून भारताचाचे नाव उज्वल करणाऱ्या या खेळाडू विद्यार्थ्यांना व इतर होतकरू खेळाडूंना कल्याण डोबिवली महापालिकेच्या कल्याण, योगीधाम येथील सिटी पार्क उद्यानात सराव करण्यास तेथील ठेकेदार व्यवस्थापनेने मनाई केल्याने या होतकरू तरुण खेळाडू विद्यार्थ्यांचा आणि त्यांना विनामूल्य प्रशिक्षण देणाऱ्या राष्ट्रीय मुख्य प्रशिक्षक अमन वर्मा यांचा हिरमोड झाला आहे. आता या सर्व खेळाडू विद्यार्थांचा सराव कुठे घ्यायचा असा प्रश्न त्यांच्यापुढे आणि खेळाडूंना पडला आहे.
केडीएमसीचे सिटी पार्क उद्यान 67 एकर वर पसरले असून जॉगिंग ट्रॅक आणि विविध खेळासाठी येथे सोयी असून या उद्यानात रोजचा प्रवेशासाठी प्रतिदिन रुपये 20/- तर पूर्ण महिन्यासाठी रुपये 300/- असे तिकीट दर आहेत. यासाठी एका ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली आहे. जम्प रोप सरावासाठी हे सर्व होतकरू खेळाडू दैनिक किंवा महिनाभर तिकीट काढून उद्यानात प्रवेश करीत असतात. जास्तीसजास्त 10 खेळाडू आलटून पालटून वेळ मिळेल तसे सरावासाठी येत असतात. त्यांना राष्ट्रीय मुख्य प्रशिक्षक अमन वर्मा हे विनामूल्य प्रशिक्षण देत आहेत.
सन 2023 आणि 2025 मध्ये अमेरिका आणि जपान येथे झालेल्या जागतिक जम्प रोप स्पर्धेत आणि थायलंड येथे झालेल्या एशियन स्पर्धेत या भारतीय खेळाडूंनी विविध गटात अनेक पदके जिंकली होती. त्या भारतीय संघात बहुतेकजण डोंबिवली, कल्याण मधील शालेय तसेच कॉलेज मराठी विद्यार्थी होते. त्यावेळी या संघाचे मुख्य प्रशिक्षक अमन वर्मा हेच होते. सदर जागतिक स्पर्धा मध्ये मेडल्स मिळाल्यावर डोंबिवली व कल्याण मधील अनेक संस्थानी, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष यांनी या खेळाडूंचा सत्कार करून त्यांना पुढे लागणाऱ्या मदतीचे आश्वासन दिले होते.
अमन वर्मा यांनी या खेळात नवीन खेळाडू यावेत यासाठी प्रशिक्षण देणे चालू केले होते. विशेष म्हणजे या खेळासाठी, प्रशिक्षण साठी शासनाकडून कोणतेही अनुदान, आर्थिक मदत मिळत नसतानाही हे खेळाडू स्वखर्चाने विदेशातील स्पर्धेत जात आहेत. त्यामुळे सदर सिटी पार्क हे जनतेच्या कररूपाने पैशातून अर्थात कल्याण डोंबिवली महापालिकेमार्फत उभे राहिले असतानाही असे मस्तवाल ठेकेदार स्वतःचा फायद्यासाठी काही नियम दाखवून या खेळाडूंना सरावापासून वंचित करीत करीत असतील तर त्यांना योग्य ती समज ही केडीएमसी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कडून मिळाली पाहिजे. तसेच या होतकरू खेळाडूंना न्याय मिळवून त्यांना पुन्हा तेथे सराव करण्याची संधी मिळाली पाहिजेच अशी मागणी डोंबिवलीकर समाजसेवक राजू नलावडे यांनी केले आहे. याबाबत उद्यानक्षेत्र पालिका विभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi