
सोलापूर, 5 डिसेंबर (हिं.स.)महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलिसांनी शहरातील स्वयंघोषित ‘दादां’ची (रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार) माहिती पोलिस ठाण्यांकडून मागविली आहे. निवडणुकीत मतदारांमध्ये दहशत निर्माण करणे, त्यांच्यावर दबाव निर्माण करून भीती घालण्याचे प्रकार ते गुन्हेगार करतात. त्यामुळे पोलिसांकडून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. निवडणूक काळात अशा गुन्हेगारांना आठ-दहा दिवसांसाठी तडीपार केले जाऊ शकते. त्यांची यादी तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.
सोलापूर शहरात दोन किंवा त्याहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची संख्या चार हजारांवर आहे. याशिवाय गंभीर गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या संशयितांचीही संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगार (दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे असलेले), ज्यांच्यामुळे सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था बिघडू शकते, अशांची पोलिस ठाणेनिहाय यादी तयार केली जाते. सण-उत्सव, निवडणुकीपूर्वी त्या गुन्हेगारांची मागील काही महिन्यांतील वर्तणूक पाहिली जाते. त्यानंतर पोलिस आवश्यकतेनुसार त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करतात. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या गुन्हेगारांच्या वर्तनात सुधारणा होत नाही किंवा झालेली नाही, ते रेकॉर्डवरील गुन्हेगार सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड