
बीड, 5 डिसेंबर, (हिं.स.)। भैरोबा वस्ती परिसरातील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने नामंजूर केला आहे. फिर्यादीच्या वतीने अॅड. तेजेस एस. नेहरकर यांनी प्रभावी युक्तिवाद करत आरोपींच्या बाजूतील विसंगती व पुराव्यांतील तफावत न्यायालयाच्या निदर्शनास आणल्याने हा महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
दिनांक १३/११/२०२५ रोजी फिर्यादी भैरोबा वस्ती येथुन नांदमाळावर गेली असता आरोपीने फिर्यादीस कागदपत्र घेवुन या अशा बहाण्याने बोलवुन घेतले. त्यानंतर संगनमत करून आरोपींनी फिर्यादीला स्कुटीवरून परत येत असताना कोंबडीपालनाच्या शेडजवळ अडवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. फिर्यादीने घडलेल्या अत्याचाराची माहिती नातेवाईकांना दिली. त्यानंतर फिर्यादीला तात्काळ मिरजगाव येथील दवाखाण्यात नेण्यात आले व त्यानंतर पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलवण्यात आले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून आष्टी पोलिस ठाण्यात आरोपी बाळू अप्पासाहेब काळे, अप्पासाहेब बापुराव काळे, अजिनाथ बापुराव काळे, श्याम उर्फ श्यामराजे अजिनाथ काळे (सर्व रा. ता. आष्टी, जि. बीड) यांच्या विरोधात गु.र.नं. ५२९/२०२५ अंतर्गत
भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७० (१) व ३(५) प्रमाणे १५ नोव्हेंबर २०२५ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. त्या नंतर आरोपींनी फौजदारी जामिनासाठी अर्ज क्र. ११६१/२०२५ जिल्हा न्यायाधीशांकडे दाखल केला होता. या सुनावणीत फिर्यादीच्या वतीने अॅड. तेजेस नेहरकर यांनी आरोपींच्या बचावातील मुद्दे अपुरे व अविश्वसनीय असल्याचे न्यायालयासमोर मांडले. घटनास्थळ. वैद्यकीय पुरावे, तसेच फिर्यादीचे जबाब यावर आधारित मांडलेल्या युक्तिवादाला न्यायालयाने मान्यता दिली. न्यायालयाने सर्व पुरावे आणि परिस्थितीचा विचार करून आरोपींचा जामीन अर्ज नामंजूर केला. या प्रकरणात अॅड. नेहरकर यांना अॅड. गौतम जी. नाईकवाडे व अॅड. सिंकदर इस्लाम शेख यांनी सहकार्य केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis