
नवी दिल्ली, ५ डिसेंबर (हिं.स.) केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी भारतीय संघाला एफईआय आशियाई घोडेस्वारी अजिंक्यपद २०२५ मध्ये ऐतिहासिक कामगिरीबद्दल सन्मानित केले. सहा सदस्यांच्या भारतीय पथकाने पटाया येथील कॉन्टिनेंटल स्पर्धेत सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धांमध्ये एकूण पाच पदके जिंकून देशासाठी इतिहास रचला.
इव्हेंटिंगमध्ये, आशिष लिमये यांनी वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक आणि सांघिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. श्रुती बोराने ड्रेसेजमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली, तीन रौप्य पदके जिंकली - दोन वैयक्तिक आणि एक सांघिक. संघातील इतर सदस्यांमध्ये शशांक सिंग कटारिया आणि शशांक कानमुडी (इव्हेंटिंग), आणि दिव्यकृती सिंग आणि गौरव पुंडिर (ड्रेसेज) होते.
खेळाडूंचा सन्मान करताना डॉ. मांडविया म्हणाले की, भारत आता अशा खेळांमध्येही यश मिळवत आहे जिथे पूर्वी जागतिक स्तरावर आपली उपस्थिती खूपच मर्यादित होती. ते म्हणाले, “हा १० वर्षांपूर्वीचा भारत नाही. गेल्या दशकात आपल्या क्रीडा परिसंस्थेत प्रचंड बदल झाले आहेत. खेळाडू आणि पदक यांच्यातील प्रत्येक अडथळा सरकार दूर करेल. आम्ही भारतात घोडेस्वारीसाठी अनुकूल क्रीडा वातावरण निर्माण करू जेणेकरून खेळाडूंना प्रशिक्षणासाठी परदेशात जावे लागू नये.”
मंत्र्यांनी असेही आश्वासन दिले की सरकार एका वर्षाच्या आत देशात एक क्वारंटाइन सेंटर स्थापन करेल, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी घोड्यांच्या वाहतुकीची दीर्घकालीन समस्या सोडवली जाईल.
तीन वेळा रौप्यपदक विजेती श्रुती बोरा यांनी मंत्र्यांच्या त्वरित कारवाईचे कौतुक केले. ती म्हणाली, “आम्ही आमच्या अडचणी मांडताच त्यांनी तत्काळ इक्वाइन डिसीज-फ्री झोन तयार करण्याचे निर्देश दिले. काही खेळाडूंना परदेशात प्रशिक्षणाला पाठवण्यापेक्षा संपूर्ण इकोसिस्टम उभारण्यावर त्यांनी भर दिला. हे केंद्र सुरू झाल्यावर भारतातील प्रशिक्षण, क्वालिफिकेशन आणि आंतरराष्ट्रीय सहभाग अत्यंत सुलभ होईल.”
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर