१३ वा ‘कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार -२०२४’ सोहळा समारंभ संपन्न
नाशिक, 26 सप्टेंबर, (हिं.स.)। – स्वातंत्र्य, समता - बंधुता आधारित कवीचा एक वेगळा वैकल्पिक संसार असतो. मात्र प्रत्यक्ष जीवनातील वास्तव व सुखापेक्षा दुखामुळे अधिक निर्मित त्याचे साहित्य हे अधिक प्रासंगिक व भावणारे असते. अशा कवीने देखील नेहमी विषमतेकडे लक्ष वेधत कुठ्याही सत्तेपेक्षा विरोधी बाकावर बसणे सभ्य व अभिरुचीपूर्ण समाजाच्या हिताचे असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ हिंदी कवी कुमार अंबुज यांनी येथे केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दिला जाणारा १३ वा ‘कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार -२०२४’ कवी श्री. कुमार अंबुज यांना येथील कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा सभागृहात प्रदान करण्यात आला. एक लाख रूपयांचा धनादेश, मानपत्र, मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मुक्त विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, प्र – कुलगुरू प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन, निवड समितीचे अध्यक्ष प्रा. चंद्रकांत पाटील, कुसुमाग्रज अध्यासन प्रमुख डॉ. दिलीप धोंडगे, वित्त अधिकारी तथा प्रभारी कुलसचिव डॉ. गोविंद कतलाकुटे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना कवी कुमार अंबुज पुढे म्हणाले की आपले लेखन इतर भाषांमध्ये वाचले जाते आणि आपापल्या पद्धतीने समजून घेत त्यास दाद दिली जाते याचे कुठल्याही लेखक - कवीला समाधान असते व पुढील लेखनासाठी ते समर्थन नेहमी बळ देत असते. कवी कुसुमाग्रज यांच्या नावाने त्यांच्याच भूमीत पुरस्कार मिळणे हे आपल्यासाठी गौरवास्पद असल्याचे देखील ते म्हणाले. याप्रसंगी कवी अंबुज यांनी 'खाना बनाती स्त्रिया’ ही संवेदनशील व ‘सब तुम्हें नही कर सकते प्यार’ ही मार्मिक कविता सादर करत उपस्थितांची मने जिंकली. अध्यक्षस्थानावरून बोलतांना मुक्त विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे म्हणाले की ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ असे मानवतावादी लिखाण करणारे संत ज्ञानेश्वर यांच्या शृंखलेतील लिखान आपणास कवी कुसुमाग्रज यांच्या साहित्यात दिसून येते. तीच परंपरा कवी कुमार अंबुज पुढे नेत असल्याचे बघावयास मिळत आहे, असे गौरवोद्गार काढले. प्र – कुलगुरू प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी कवीची निर्मिती ही सृजनात्मक शब्दरचनेसोबत उपदेशात्मक देखील असल्याचे सांगितले. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्रा. चंद्रकांत पाटील यांनी मुक्त विद्यापीठातर्फे कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे राष्ट्रीय स्तरावर अधिक महत्व असल्याचे आपणास वारंवार जाणवत असल्याचे अनुभवासह सांगितले.
प्रास्ताविकात कुसुमाग्रज अध्यासन प्रमुख डॉ. दिलीप धोंडगे यांनी या पुरस्कारामुळे दरवर्षी मराठी भाषेचा भारतातील वेगवेगळ्या भाषांसोबत सोहार्दाचा एक पूल बांधला जात असल्याचे सांगितले. त्यांनी पुरस्कार मानपत्राचे वाचन देखील केले. पुरस्कार निवड समिती सदस्य डॉ. गोरख थोरात यांनी कवी कुमार अंबुज यांच्या कवितेचा मराठी अनुवाद वाचून दाखवला. यानिमित्ताने कवी कुमार अंबुज यांच्या निवडक कवितांचा मराठी अनुवादासह संग्रह असलेल्या व विद्यापीठ निर्मित पुस्तिकेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर