नाशिक, 26 सप्टेंबर, (हिं.स.)। पेठ तालुक्यात मागील तीन दिवसात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शासन स्तरावर बाधित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा करणार असून बाधित शेतकऱ्यांच्या झालेल्या पीक नुकसानीचा अहवाल शासनास सादर करावा, अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिल्या.
आज पेठ तालुक्यातील तोंडवळ, आडगाव, अध्रृटे, खोकरतळे, बिलकस, केळविहीर, रानविहीर, आडगाव भूवन आदी गावातील शेतशिवारात शेतक-यांच्या थेट शेतात जावुन नागली, वरई, भात, उडीद, वाल या पिकांच्या नुकसानीची पाहणी मंत्री श्री झिरवाळ यांनी केली. यावेळी समवेत तहसीलदार आशा गांगुर्डे, गोवर्धने गटविकास अधिकारी जगन सुर्यवंशी, नायब तहसीलदार दिपक, गोकुळ झिरवाळ यांच्यासह अधिकारी व ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.
मंत्री श्री झिरवाळ म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानीबाबतचे सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याची घोषणा केली आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे करण्यास गती द्यावी व अहवाल शासनासकडे सादर करावा. आवश्यक ठिकाणी शेतकऱ्यांना वैद्यकीय सेवा पुरविण्यात यावी. सतत झालेल्या पावसामुळे शेतपीक ऐन फुलोऱ्यात असतांना अतोनात नुकसान झाले असून पिकांवर करपा रोगाचा प्रार्दूभाव वाढला आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही मंत्री श्री. झिरवाळ यांनी कृषीअधिकाऱ्यांना दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV