रत्नागिरी, 26 सप्टेंबर, (हिं. स.) : राजापूर अर्बन बँकेची आर्थिक स्थिती स्थिर असून ठेवीदारांच्या रकमेची संपूर्ण सुरक्षा सुनिश्चित असल्याचा निर्वाळा बँकेचे अध्यक्ष संजय ओगले यांनी पत्रकार परिषदेत दिला.
राजापूर अर्बन बँकेच्या रत्नागिरी शाखेत रत्नागिरी शाखेतील शाखा व्यवस्थापकाकडून काही संशयास्पद व्यवहार झाल्याने बाजारामध्ये बँकेच्या विश्वासार्हतेला काही प्रमाणात तडा गेल्याने बँकेच्या ठेवींमध्ये घट झालेली आहे. मात्र बँकेची आर्थिक स्थिती स्थिर असून ठेवीदारांच्या रकमेची संपूर्ण सुरक्षा सुनिश्चित केलेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमक सुचनांचे काटेकोरपणे पालन करून बँकेचे कामकाज पारदर्शक व जबाबदार बँकिंग पद्धतीने सुरू असल्याचे श्री. ओगले यांनी सांगितले.
बँकेने गणेशोत्सव काळात सुरू केलेल्या विघ्नहर्ता ठेव योजनेलाही सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून आतापर्यंत ६ कोटी १३ लाखाच्या ठेवी या योजनेअंतर्गत गोळा करण्यात आल्याचे ओगले यांनी सांगितले.
राजापूर अर्बन बँकेची १०४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या २८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बँकेच्या सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील प्रगतीबाबत माहिती देण्यासाठी बँकेच्या राजापूर शाखेतील सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ओगले यांनी बँकेच्या एकूणच कामकाजाची माहिती दिली.
राजापूर अर्बन बँक १०४ वर्षे उज्ज्वल परंपरा लाभलेली अग्रगण्य सहकारी संस्था असून सन २०२४-२५ मध्ये बँकेला काही आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे. मार्च २०२५ मध्ये बँकेच्या ठेवी ५२३ कोटी होत्या. मात्र रत्नागिरी शाखेतील शाखा व्यवस्थापकांकडून काही संशयास्पद व्यवहार झाल्याने बाजारामध्ये बँकेच्या विश्वासार्हतेला काही प्रमाणात तडा गेल्याने बँकेच्या आजअखेर ठेवींमध्ये काही प्रमाणात घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या लेखापरीक्षणामध्ये लेखापरीक्षकांकडून बँकेला ड वर्ग लेखापरीक्षण दर्जा देण्यात आला होता. मात्र याबाबत बँकेने तत्काळ आवश्यक ती सुधारणा करून आणि योग्य ते पुरावे सादर करून सहकार आयुक्त व निबंधकांकडे यांच्याकडे अपील केले होते. सहकार आयुक्तांनी वैधानिक लेखापरीक्षकांनी दिलेला ड वर्ग बदलून बँकेला ब वर्ग दिला आहे.
या आव्हानात्मक परिस्थितीदरम्यान अचानक पसरलेल्या अफवांमुळे काही प्रमाणात ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या ठेवींची रक्कम काढली असून ठेवींमध्ये सुमारे १०० कोटींची घट झाली आहे. तरीही बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांच्या परिश्रमामुळे तसेच ठेवीदार व सभासद यांच्या सहकार्यामुळे आज बँक स्थिर अवस्थेत आहे. १०४ वर्षांची परंपरा, सभासद व ठेवीदारांचा विश्वास व ग्राहकांशी नाळ जोडलेली अशी राजापूर अर्बन बँक आहे. त्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती स्थिर आहे. ठेवीदारांच्या रकमेची संपूर्ण सुरक्षा सुनिश्चित केलेली आहे. नियमक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून पारदर्शक व जबाबदार बँकिंग सेवा सुरू असल्याचेही ओगले यांनी सांगितले.
गेली अनेक वर्षे बँक आपल्या सभासदांना १० टक्के लाभांश देत होती. मात्र यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे प्रस्ताव सादर केला असून त्यांच्या परवानगीशिवाय यावर्षी लाभांश जाहीर करता येणार नाही, असेही ओगले यांनी सांगितले.
यावेळी बँकेच्या मॅनेजमेंट बोर्डचे अध्यक्ष अॅड. शशिकांत सुतार, बँकेचे उपाध्यक्ष विजय पाध्ये, संचालक जयंत अभ्यंकर, बँकेचे अधिकारी रमेश काळे आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी