अमरावतीत काँग्रेसचा मोर्चा – भाजपचा जल्लोष; पंचवटी चौकात तणाव
अमरावती, 26 सप्टेंबर (हिं.स.) शहरातील पंचवटी चौकात आज सकाळी राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. एका बाजूला काँग्रेसने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व अन्य मागण्यांसाठी मोर्चा काढला. तर दुसऱ्या बाजूला भाजपच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेख
अमरावतीत काँग्रेसचा मोर्चा – भाजपचा जल्लोष; पंचवटी चौकात तणावाचं वातावरण


अमरावती, 26 सप्टेंबर (हिं.स.)

शहरातील पंचवटी चौकात आज सकाळी राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. एका बाजूला काँग्रेसने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व अन्य मागण्यांसाठी मोर्चा काढला. तर दुसऱ्या बाजूला भाजपच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आगमनानिमित्त भाजपकडून मोठा जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

काँग्रेसकडून आज तहसील कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते पंचवटी चौकात जमले होते. या मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध मागण्या – कर्जमाफी, वीजबिल माफी, विमा दावे आणि पीक नुकसानीबाबत ठोस निर्णय घेण्याची मागणी करण्यात आल्या. त्याचवेळी, भाजपकडून अमरावतीत पक्ष संघटन मेळाव्यात रवींद्र चव्हाण हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांच्या स्वागतासाठी बँड-बाजा, ढोल-ताशा आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मोठा जल्लोष करण्यात आला. या दोन्ही राजकीय घडामोडी जवळपासच्या ठिकाणी एकाचवेळी होत असल्याने पंचवटी चौकात मोठा तणाव निर्माण झाला. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते काही मीटर अंतरावरच आमने-सामने आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली. शेतकऱ्यांचा विजय असो, आमच्या मागण्या मान्य करा अशा काँग्रेसच्या घोषणांना उत्तरादाखल भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मोदी सरकार जिंदाबाद, विकासाच्या मार्गावर महाराष्ट्र अशा घोषणा दिल्या.

या पार्श्वभूमीवर, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परंतु, काही वेळातच काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. काही ठिकाणी जोरदार वाद आणि धक्काबुक्कीचे प्रकार घडले. सुरक्षा व्यवस्थेसाठी अतिरिक्त पोलीस फोर्स पाचारण करण्यात आली. वरिष्ठ अधिकारी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. काही वेळाने काँग्रेसचा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला व तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande