परभणी, 26 सप्टेंबर, (हिं.स.)। आत्महत्या प्रतिबंधासाठी व्यक्त व्हा – मुक्त व्हा. जीवनातील अडचणींना सामोरे जाताना स्वतःचा स्वीकार करा, सामाजिक आधार शोधा, संयम ठेवा व ध्यानधारणा, शिथिलीकरण तंत्रांचा अवलंब करा. अडचणीच्या क्षणी चांगले मित्र, नातेवाईक तसेच समुपदेशक व मानसोपचारक यांची मदत घ्यायला लाजू नये,” असे आवाहन डॉ. देवरे यांनी केले. त्यांनी स्पष्ट केले की आत्महत्या रोखण्यासाठी वैयक्तिक तसेच सामाजिक पातळीवरील प्रयत्न महत्त्वाचे आहेत असे प्रतिपादन जिल्हा सामान्य रुग्णालयाचे मानसशास्त्रज्ञ डॉ. सुभाष देवरे यांनी केले.परभणी येथील शारदा महाविद्यालयात जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून जिल्हा सामान्य रुग्णालय परभणीचे मानसशास्त्रज्ञ डॉ. सुभाष देवरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
जागतिक आरोग्य संघटनेने १० सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून घोषित केला आहे. या निमित्ताने जाणीवजागृतीसाठी शारदा महाविद्यालयाने घेतलेला उपक्रम स्तुत्य असल्याचे मत डॉ. देवरे यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, मराठवाडा व विदर्भ या भागात सर्वाधिक आत्महत्या होत असून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना कोरडा व ओला दुष्काळ कारणीभूत आहे. तर १५ ते ४० या वयोगटातील युवक-युवती आत्महत्या करणाऱ्यांमध्ये आघाडीवर आहेत. विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्यांचे प्रमाणही वाढत असून, आयआयटी, नीट, स्पर्धा परीक्षा यांचे निकाल लागण्याच्या आधी आत्महत्या होत आहेत. पालकांचा दबाव, सामाजिक दबाव व वैफल्य यामुळे हे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे मुलांना समस्यांना धैर्याने सामोरे जायला शिकविणे काळाची गरज आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. बबन पवार यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. देवरे यांच्यासह उपप्राचार्य डॉ. शामसुंदर वाघमारे, मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. एन. व्ही. सिंगापुरे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थिनी कु. राधा साबळे, कु. वैभवी साबळे व फैजा अंजुम यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis