परभणी, 26 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यात सर्वदूर अतिवृष्टीने खरिप पिकांचे अतोनात असे नुकसान झाले आहे. विशेषतः नदीकाठच्या गावांमधील पिके पूर्णतः उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकर्यांना सरसगट जास्तीत जास्त मदत मिळावी या दृष्टीने हे सरकार कटिबध्द आहे. सर्व निकष बाजूला ठेऊन शेतकर्यांना जास्तीत जास्त मदत केली जाईल, असे आश्वासन जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.
पालकमंत्री सौ. साकोरे-बोर्डीकर यांनी मानवत तालुक्यातील रामपुरी व थार या दोन गावांना भेटी दिल्या. गोदावरी नदीच्या पात्रातील बॅक वॉटरमुळे या दोन गावात शेत पिकांचे अतोनात असे नुकसान झाले. त्या नुकसानीची पाहणी केली व या शेतकर्यांना शंभर टक्के मदत द्यावयाबद्दल आपण सर्वार्थाने प्रयत्न करु, असे ठोस आश्वासन दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे या संदर्भात निधीची मागणी केली आहे, हे ही निदर्शनास आणून दिले. दरम्यान, रामपुरी व थार या दोन गावांना बॅक वॉटरमुळे दरवर्षी होणारे नुकसान टाकळण्याकरीता जलसंपदा विभागाद्वारे कायमस्वरुपी उपायोजना व्हावी, या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असेही पालकमंत्री साकोरे यांनी नमूद केले.
रामपुरी येथील मच्छिमारांच्या जाळ्यांच्या नुकसानीची व शेतीमध्ये साचलेल्या गाळाची नोंद घ्यावी, अशाही सूचना पालकमंत्र्यांनी संबंधितांना केल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis