परभणी, 26 सप्टेंबर, (हिं.स.)। गंगाखेड तालुक्यातील खळी, सुनेगाव, सायाळा आणि परिसरात आ.रत्नाकर गुट्टे यांनी भेट देऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. शिवाय, सविस्तर आढावा घेतला. तसेच वैद्यकीय पथकासह पूरग्रस्त भागातील पाहणी करताना मन अगदी पिळवटून गेले. आसपासची शेतं-शिवारं पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
जनावरे, पिके, घरे या सगळ्यावर या आपत्तीचा मोठा घाला बसला आहे. तुटलेल्या संपर्कामुळे अनेकांना मूलभूत सोयी मिळालेल्या नाहीत. त्यामुळे आम्ही वैद्यकीय पथकांसह पाहणी केली. आजारी, लहानग्या मुलांसाठी आणि महिलांसाठी आरोग्य सेवा तातडीने पोहोचवणे अत्यावश्यक आहे. शिवाय, पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी तातडीने सरसकट पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, तसेच या परिस्थितीत ओला दुष्काळ जाहीर करावा, यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आ.रत्नाकर गुट्टे यांनी उपस्थितीत शेतकऱ्यांना सांगितले.
यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, सरपंच शिवाजी पवार, तालुका आरोग्य अधिकारी मनोजकुमार दिक्षित यांच्यासह तहसील, आरोग्य विभाग, नगरपालिका विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis