शेतकऱ्यांना एकरी ५० हजाराची भरपाई द्या : जयंत पाटील
सोलापूर, 26 सप्टेंबर (हिं.स.)। महापुराने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एकरी कमीत कमी ५० हजाराची नुकसान भरपाई सरकारने दिलीच पाहिजे, अशी आग्रही मागणी माजी मंत्री जयंत पाटील यांनी माढा तालुक्यातील पूरग्रस्त गावांच्या भेटीप्रसंगी केली. माजी मंत्री जयंत पाट
शेतकऱ्यांना एकरी ५० हजाराची भरपाई द्या : जयंत पाटील


सोलापूर, 26 सप्टेंबर (हिं.स.)।

महापुराने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एकरी कमीत कमी ५० हजाराची नुकसान भरपाई सरकारने दिलीच पाहिजे, अशी आग्रही मागणी माजी मंत्री जयंत पाटील यांनी माढा तालुक्यातील पूरग्रस्त गावांच्या भेटीप्रसंगी केली. माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार धैर्यशील मोहिते‌-पाटील, आमदार अभिजित पाटील, अनिल सावंत यांनी माढा तालुक्यातील महापुराने बाधित झालेल्या वाकाव, लोंढेवाडी या गावांची पाहणी केली व शेतकऱ्यांशी ग्रामस्थांची संवाद साधला.

यावेळी पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, महापुराचे चित्र अतिशय भयानक आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांना एकरी कमीत कमी ५० हजारांची नुकसान भरपाईही ताबडतोब द्यावी व ती सरसकट द्यावी. शासनाने पंचनामा करण्याच्या भानगडीत पडू नये. कारण सर्वत्र ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. पंचनामे करण्यात वेळ घालवू नये. गावाच्या गावे पाण्याखाली गेली आहेत. जिथे जमिनी खरडून गेल्या आहेत. तिथे एकरी तीस हजार रुपये द्यावेत. दीर्घ मुदतीच्या पिकांनाही सरकारने मोठी नुकसान भरपाई द्यावी.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande