रत्नागिरी, 26 सप्टेंबर, (हिं. स.) : कुणबी नावाखाली मराठा समाज ओबीसी आरक्षणामध्ये घुसत आहे. आज एका भागापुरत्या झालेल्या शासन निर्णयाची व्याप्ती भविष्यामध्ये राज्यभर होऊ शकते. त्यामुळे शांत न बसता आतापासून संघर्षाचा लढा उभारणे गरजेचे आहे. न्यायालयीन लढ्यासोबत रस्त्यावरचीही लढाई लढणे गरजेचे आहे. भावी पिढीच्या भविष्यासाठी होणार्या या लढ्यामध्ये सर्वांनी लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे,
असे आवाहन कुणबी समाजोन्नती संघ (मुंबई) संघटनेचे अध्यक्ष अनिल नवगणे यांनी केले.
कुणबी समाजोन्नती संघातर्फे पुढील महिन्यात मुंबई येथे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन छेडले जाणार आहे. त्याअनुषंगाने कुणबी समाज बांधवांशी संवाद साधण्यासाठी कुणबी एल्गार मेळाव्याचे आयोजन राजापूरमध्ये करण्यात आले होते. यावेळी बोलताना श्री. नवगणे बोलत होते. कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण शाखा राजापूरचे अध्यक्ष दीपक नागले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्याला कुणबी संघाचे अरविंद डाफळे, राजापूर शाखेचे अध्यक्ष शिवाजी तेरवणकर, ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर, ओबीसी जनमोर्चाचे राजापूरचे अध्यक्ष महेश शिवलकर, अॅड. शशिकांत सुतार, प्रकाश मांडवकर, रवींद्र नागरेकर, मधुकर तोरस्कर, मानसी दिवटे, सत्यवान कणेरी, चंद्रकांत जानस्कर, अॅड. महेंद्र मांडवकर, नरेश शेलार यांच्यासह कुणबी संघाचे पदाधिकारी आणि ओबीसी समाजनेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऍड. शशिकांत सुतार यांनी ओबीसी आरक्षण, त्यासंबंधी कायदेशीर बाबी सविस्तरपणे मांडताना ओबीसी आरक्षण बचावाचे महत्त्व मार्गदर्शनाद्वारे अधोरेखित केले.यावेळी प्रकाश मांडवकर, श्रीकृष्ण वणे, शिवाजी तेरवणकर, अॅड. महेंद्र मांडवकर आदींनीही मार्गदर्शन केले. दीपक नागले यांनी प्रास्ताविकात ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी