नाशिक रोडला पुन्हा बिबट्याचे दर्शन; नागरिक भयभीत
नाशिक, 26 सप्टेंबर, (हिं.स.)। नाशिक रोड शहरात वन्यप्राण्यांचे दर्शन वाढत चालल्याचे आणखी एक उदाहरण आज पहाटे दिसून आले. लॅमरोडवरील हॉटेल लोटसच्या मागील विद्या विकास मंदिर शाळेच्या आवारात आज पहाटे पाच ते सहाच्या सुमारास बिबट्याने दर्शन दिल्याने परिसरात
नाशिक रोडला पुन्हा बिबट्याचे दर्शन, नागरिक भयभीत


नाशिक, 26 सप्टेंबर, (हिं.स.)। नाशिक रोड शहरात वन्यप्राण्यांचे दर्शन वाढत चालल्याचे आणखी एक उदाहरण आज पहाटे दिसून आले. लॅमरोडवरील हॉटेल लोटसच्या मागील विद्या विकास मंदिर शाळेच्या आवारात आज पहाटे पाच ते सहाच्या सुमारास बिबट्याने दर्शन दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती समजताच तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.

गेल्या महिन्यात दोन लहान मुलांवर बिबट्याने हल्ला करून ठार केले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच तीव्र झाले आहे. दरम्यान, बिबट्याचे दर्शन झालेल्या परिसराच्या अगदी जवळ असलेल्या वडनेर भागातही मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी एकत्र येऊन वनविभागाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. सध्या नवरात्रीचे दिवस सुरू असून अनेक नागरिक भगूर येथे श्री रेणुका माता आणि नाशिक रोडवरील श्री दुर्गा मंदिरांमध्ये पहाटे व रात्री आरतीसाठी जातात. अशा वेळी बिबट्याचे दर्शन होणे ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे नागरिकांनी सांगितले. वनविभागाने शक्य तितक्या लवकर बिबट्याला जेरबंद करून नागरिकांना सुरक्षिततेचा दिलासा द्यावा, अशी एकमुखी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande