छत्रपती संभाजीनगर, 26 सप्टेंबर (हिं.स.)।
मराठवाड्यातील शेतकरी माता - भगिनी यांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची व्यथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर अत्यंत तळमळीने मांडली आहे. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने सर्वत्रच हृदयाला व्याकुळ करणाऱ्या घटना समोर येत आहेत, असे शिवसेना उबाठा नेते अंबादास दानवे यांनी येथे सांगितले.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, बीड जिल्ह्यातील कुर्ला येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर माता - भगिनींनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची मनाला वेदना देणाऱ्या कथाच मांडल्या. मराठवाड्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे चित्र प्रचंड विदारक आहे. राज्य सरकारने तातडीने सरसकट मदतीची घोषणा जाहीर करून शेतकरी राजाला या संकटातून बाहेर काढावे, अशी स्पष्टपणे भूमिका ठाकरे यांनी मांडली.
याप्रसंगी शिवसेना खासदार संजय राऊत, चंद्रकांत खैरे, आमदार मिलिंद नार्वेकर, जिल्हाप्रमुख गणेश वरेकर व उल्हास गीराम उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis