नांदेड, 26 सप्टेंबर (हिं.स.) मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी हदगाव, अर्धापूर, नांदेड, लोहा तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 3 वेळा अतिवृष्टीग्रस्त पाऊस होऊन शेती, रस्ते, पुल यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीची जास्तीतजास्त मदत शेतकऱ्यांना त्वरीत मिळून देणार असल्याची ग्वाही राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली. नांदेड जिल्ह्यात हदगाव, अर्धापूर, नांदेड, लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन मंत्री संजय राठोड यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व धीर दिला. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे अश्वस्त केले. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबुराव पाटील कोहळीकर, आमदार आनंद पाटील बोंढारकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील धानोरा, अर्धापूर तालुक्यातील चिंचबन, नांदेड तालुक्यातील नांदुसा, लोहा तालुक्यातील शेवडी, भेंडेगाव या गावातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी श्री. राठोड यांनी केली. शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी शासन स्तरावर मांडून त्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी लोहा तालुक्यातील खराब झालेल्या पुल, विहिरी, रस्ते याचीही पाहणी केली.
जिल्ह्यात ऑगस्टपासून आतापर्यंत तीन वेळा अतिवृष्टी झाली आहे. तसेच गोदावरी नदीत मोठ्याप्रमाणात विसर्ग सुरु असून यामुळे शहरातील सखल भाग पाण्याखाली जाऊन अनेक घरात पाणी शिरले आहे. यामुळे 450 लोकांना सुरक्षीतरित्या निवाऱ्यात हलवले आहे. गोदावरी नदीच्या बॅकवाटरमुळे शेतीचे बरेच नुकसान जिल्ह्यात काही गावांमध्ये झाले आहे. या सर्व बाबींचा आढावा श्री. राठोड यांनी जिल्हा प्रशासनाकडून आज जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत घेतला. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबुराव पाटील कोहळीकर, आमदार आनंद पाटील बोंढारकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, सहायक जिल्हाधिकारी जेनित चद्रा दोन्तुला यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी नुकसानीच्या मदत जाहीर झालेल्या याद्या प्रत्येक गावात प्रसिद्ध करा. खचलेल्या व बुजलेल्या विहिरींचा अहवाल शासनाला पाठवा. शहरात पाणी शिरलेल्या घरांचे पंचनामे तात्काळ करुन पात्र लोकांना आठवडाभरात मदत करा. शेतकऱ्यांचा वीज पुरवठा पुर्वरत करण्यावर प्राधान्याने भर द्या. पुराच्या पाण्याचे कायमस्वरुपी नियोजन करण्यासाठी गाळमुक्त धरण, गाळ युक्त शिवार योजनेतील कामे प्राधान्याने करण्यावर भर द्या. दुरूस्त व नादुरूस्त झालेल्या रस्त्याचे प्रस्ताव शासनाला पाठवा. मृत जनावरांच्या मदतीबाबतचा प्रश्न लवकरच मार्गी लावा, असे निर्देश मंत्री संजय राठोड यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. बैठकीत आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबुराव कोहळीकर, आमदार आनंदराव बोंढारकर यांनी त्यांच्या मतदारसंघातील विविध समस्या सोडवण्याबाबतच्या मागण्या शासनाकडे मांडल्या. जिल्ह्यात ऑगस्ट ते आतापर्यंत झालेल्या अतिवृष्टीची, नुकसानीची, मदतीची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे दिली.
----------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis