रत्नागिरी, 26 सप्टेंबर, (हिं. स.) : चिपळूण शहरातील गांधारेश्वर नदीच्या पुलावर एका महिलेची चप्पल, पर्स आणि मोबाइल सापडला. संबंधित महिलेने नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
धामापूर (ता. संगमेश्वर) येथील अपेक्षा अमोल चव्हाण (४०) मंगळवारी (दि. २३) दुपारी चारच्या सुमारास घरातून कोणालाही काही न सांगता बाहेर पडल्या. रात्रीपर्यंत त्या परत न आल्याने त्यांचे पती अमोल चव्हाण यांनी बुधवारी (दि. २४) सकाळी संगमेश्वर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
यावर पोलिसांनी संबंधित गुन्हा दाखल केला असून, मोबाइल लोकेशन तपासल्यानंतर अपेक्षा चव्हाण यांचे शेवटचे लोकेशन चिपळूण येथील गांधारेश्वर पुलावर दिसून आले. या माहितीच्या आधारे कुटुंबीय पुलावर पोहोचले असता त्यांना चप्पल, पर्स आणि मोबाइल सापडले.
पोलिसांकडून महिलेचा शोध सुरू असून नदीपात्रात शोधमोहीम चालू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी