नांदेड, 26 सप्टेंबर (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना शनिवार 27 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे
नांदेड जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालय, खाजगी शिकवणी तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थांना शनिवार 27 सप्टेंबर 2025 रोजी सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांनी आज निर्गमीत केला आहे.
मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या पूर्व सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यास शनिवार 27 सप्टेंबर 2025 रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्प पूर्णपणे भरलेले असून सर्व नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग चालू आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी इशारा पातळी गाठलेली असल्याने नांदेड जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. नांदेड जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरिता जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालये (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक महाविद्यालय) मधील विद्यार्थ्यांना शनिवार 27 सप्टेंबर 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis