पुणे, 26 सप्टेंबर (हिं.स.)। पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा (De-Novo) कार्यक्रम जाहीर झाला असून सन २०२० मध्ये नाव नोंदणी असलेल्या पदवीधर व शिक्षकांना पुन्हा नव्याने नावनोंदणी करणे आवश्यक आहे. अधिकाधिक पात्र मतदारांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदवावे यादृष्टीने राजकीय पक्षांनी व शिक्षण संस्थांनी सक्रीय सहभाग द्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले. विधान भवनात आयोजित पदवीधर व शिक्षक मतदार संघातील याद्यांमध्ये नव्याने नाव नोंदणी करण्यासंदर्भात राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांच्या बैठकीत डॉ. पुलकुंडवार बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अपर आयुक्त तुषार ठोंबरे, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मीनल कळसकर, राजकीय पक्षांचे जिल्ह्यातील प्रमुख, प्रतिनिधी तसेच विभागातील सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकारी, राजकीय पक्ष प्रमुख व शैक्षणिक संस्था प्रमुख दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.डॉ.पुलकुंडवार म्हणाले, पदवीधर नाव नोंदणीसाठी नमुना क्रमांक १८ व शिक्षक नाव नोंदणीसाठी नमुना क्रमांक १९ भरुन देणे आवश्यक आहे. याकरिता भारत निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या यादीतील विद्यापीठातून १ नोव्हेंबर २०२५ पूर्वी किमान ३ वर्षापूर्वी पदवीधर झालेला किंवा पदवीशी समकक्ष शैक्षणिक पात्रता धारण करणारा पदवीधर पात्र राहील. तसेच २०१९ ते २०२५ या कालावधीत किमान ३ वर्षे शिक्षक पदावर कार्यरत असलेला, माध्यमिक व त्यावरील दर्जाच्या मान्यताप्राप्त शाळांमधील पूर्णवेळ शिक्षक नाव नोंदणीसाठी पात्र राहील. शैक्षणिक संस्था एकत्रितरित्या सर्व शिक्षकांचे नोंदणी अर्ज संबंधित तहसील कार्यालयात जमा करु शकतात. शैक्षणिक संस्थांनी नमुना क्रमांक २ मधील शिफारशीसह अर्ज सादर करावे
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु