लातूर, 26 सप्टेंबर (हिं.स.)।
लातूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने थकीत कर, तडजोड शुल्क आणि पर्यावरण कर न भरलेल्या 25 वाहनांवर कारवाईचा केली आहे. वायुवेग पथकाने मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्ह्यांखाली ही वाहने लातूरमधील बाभळगाव रोडवरील परिवहन भवन येथील कार्यालयाच्या आवारात लावून ठेवली आहेत. वाहन मालक, चालक किंवा वित्तदात्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर करून व थकबाकी भरून ही वाहने सोडवून घ्यावीत, असे आवाहन कार्यालयाने केले आहे. पुढील 30 दिवसांत ही वाहने सोडवून न घेतल्यास ही वाहने बेवारस समजून जाहीर लिलावाद्वारे विक्री केली जाईल. प्राप्त रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा करून वाहनांची विल्हेवाट लावली जाईल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिषकुमार अय्यर यांनी कळविले आहे.
बरेच महिने उलटूनही कोणीही या वाहनांवर हक्क सांगण्यासाठी पुढे आलेले नाही. त्यामुळे ही वाहने खराब होण्याची, गंज चढण्याची आणि त्यांचे मूल्य कमी होण्याची शक्यता आहे. तसेच, पेट्रोल-डिझेल गळतीमुळे आग लागण्याचा धोकाही नाकारता येत नाही. यामुळे वाहनांच्या सुरक्षिततेसाठी वेळ आणि संसाधने खर्च होत आहेत. या संदर्भात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिषकुमार अय्यर यांनी वाहने सोडवून घेण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार 30 दिवसात वाहने सोडवून न घेतल्यास लिलावाची प्रक्रिया www.mstcindia.co.in या संकेतस्थळावर आणि कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर जाहीर केली जाईल.
वाहनांची यादी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रदर्शित करण्यात आली आहे. लिलावाची तारीख, वेळ आणि ठिकाणाची माहितीही संकेतस्थळावर आणि नोटीस बोर्डावर उपलब्ध असेल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis