सोलापूर, 26 सप्टेंबर (हिं.स.)। सीना नदीच्या पुराच्या पाण्याची पातळी कमी होण्यास सुरवात झाली आहे. मात्र, अद्यापही घरे व शेती पाण्याखालीच आहे. यामुळे पूरग्रस्तांचा मुक्काम तात्पुरत्या निवारा केंद्रामध्येच आहे. या पुराचा तालुक्यातील नदीकाठावरील पाच गावांसह नंदूर व डोणगाव या चार किलोमीटर लांब असणाऱ्या गावांनाही फटका बसला आहे.सीना नदीच्या पाण्याच्या पातळीत घट झाल्यामुळे पूरग्रस्त भागाला काही अंशी दिलासा मिळाला. पाकणी, शिवणी, तिऱ्हे, बेलाटी, तेलगाव या नदीकाठावरील गावांसह डोणगाव या नदीपासून चार किलोमीटर दूर असलेल्या गावालाही पुराचा मोठा फटका बसला आहे.डोणगावमधील पाण्याची पातळी कमी झाली; मात्र बहुतांश घरांमध्ये अद्याप पाणी आहे. या परिसरातील काही फळबागा पाण्याखाली गेल्या आहेत.तेलगावमध्ये पाण्याची पातळी कमी झाली असली तरी, अद्याप घरे पाण्याखालीच आहेत. तिऱ्हे परिसरात नदीच्या पाण्याच्या पातळीत घट झाल्यामुळे रात्रीपासून सोलापूर- कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. मात्र गावातील जवळपास दोनशे घरांमध्ये अद्याप पुराचे पाणी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड