सोलापूर, 26 सप्टेंबर, (हिं.स.)। शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचा राज्यविस्तार मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून, संपूर्ण महाराष्ट्रभरातील २०० पेक्षा अधिक साधुसंत व कीर्तनकार या सेनेशी जोडले गेले आहेत. राज्याच्या इतिहासातील ही सर्वात मोठी साधुसंतांची राजकीय पक्षाशी थेट समन्वय असणारी संघटना ठरली आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात वारकरी संप्रदायासह महानुभव, दत्त, शीख, गोसेवक तसेच इतर ५० पेक्षा अधिक संप्रदायांच्या उपक्रमांना सहाय्यभूत ठरणारे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्या प्रत्येक संप्रदायाशी अधिक घट्ट समन्वय साधण्यासाठी शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचा राज्यव्यापी विस्तार करण्यात आला आहे.
या निमित्ताने श्री. अक्षयमहाराज भोसले यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष व शिवसेना पक्ष प्रवक्ता म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विशेष म्हणजे संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज व संत एकनाथ महाराज यांच्या वंशजांचाही या संघटनेत थेट सहभाग असून, हे पाऊल अध्यात्मिक क्षेत्रातील एक ऐतिहासिक पर्व ठरले आहे.दरम्यान,सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर शहर प्रमुख (समन्वयक) म्हणून श्रीनिवास उपळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र शिवसेना पक्ष सचिव श्री. संजय मोरे यांनी जाहीर केले. स्थानिक पातळीवर दांडगा जनसंपर्क व अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय व अध्यात्मिक क्षेत्रात दिलेले योगदान या महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली आहे.या नियुक्तीमुळे श्रीक्षेत्र पंढरपूर मधील वारकरी भाविक भक्तांच्या समस्या अडीअडचणी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचणार असून, संपूर्ण अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रातून या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड