- केटीएचएमच्या एमए पत्रकारिता विभागातील विद्यार्थिनींचे सर्वेक्षण
नाशिक, 26 सप्टेंबर (हिं.स.)।
: केंद्र सरकारने जीएसटीचे दर कमी केल्यानंतरही नाशिकमधील अनेक व्यापारी, दुकानदार आणि ग्राहकांमध्ये संभ्रम कायम असल्याचे चित्र आहे. यासंदर्भात केटीएचएम महाविद्यालयातील एम ए पत्रकारिता विभागाच्या विद्यार्थिनींनी शहरात विविध ठिकाणी केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली.
या सर्वेक्षणात एम ए पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागातील द्वितीय वर्षाच्या अंजली अहिरे, आरती गाढवे व तृप्ती क्षीरसागर या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.या सर्वेक्षणामध्ये नुकत्याच लागू झालेल्या जीएसटीच्या अंमलबजावणीबाबत व्यापाऱ्यांनी आपली मते स्पष्टपणे व्यक्त केली. व्यापारी, ग्राहक, दुकानदार यांनी मिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सर्वेक्षणात लघु व किरकोळ व्यापाऱ्यांचा, दुकानदारांचा, मोठा सहभाग होता. यामध्ये अनेकांनी जीएसटीमुळे व्यवहारात पारदर्शकता आली असली तरी कागदोपत्री प्रक्रिया आणि करस्लॅबमधील गुंतागुंत अजूनही त्रासदायक असल्याचे सांगितले. मोठ्या उद्योग व कंपन्यांनी मात्र जीएसटीचे स्वागत केले असून ‘एक राष्ट्र-एक कर’ या संकल्पनेमुळे देशभर एकसमान करप्रणाली तयार झाली असल्याचे मत व्यक्त केले. ग्राहक वर्गाकडूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या. दर कमी झाल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले. काही व्यापाऱ्यांनी करदरातील बदलामुळे दैनंदिन खर्च कमी होणार असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी करतज्ज्ञांनी मात्र जीएसटी हा दीर्घकालीन सुधारात्मक उपाय असल्याचे मत नोंदवले. डिजिटल प्रणालीमुळे महसूलवाढ झाली असून, कर चुकवेगिरी कमी झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. एकूणच, या सर्वेक्षणातून जीएसटीबद्दल व्यापाऱ्यांत आणि ग्राहकांमध्ये अजूनही संभ्रम असून, सुधारणा करण्याची अपेक्षा असल्याचे चित्र स्पष्ट झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV