कोल्हापूर, 26 सप्टेंबर, (हिं.स.)। आत्मनिर्भर भारत-स्वदेशी अभियान संकल्पाच्या प्रचार प्रसारासाठी खा. धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली, भाजप कार्यकर्त्यांनी महाद्वार रोड-जोतिबा रोडवर व्यापार्यांच्या भेटी घेतल्या. स्वदेशीच्या वापरातून देशाचे हीत आहे, हे पटवून दिले. तर व्यापार्यांनी सुध्दा खासदार महाडिक यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वापराचा नारा दिला आहे. आत्मनिर्भर भारत, स्वदेशी अभियान असा मोदींचा संकल्प असून, देशवासियांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. मोदी यांचा स्वदेशी वापराचा संकल्प यशस्वी करण्यासाठी आणि या अभियानाचे महत्व पटवून देण्यासाठी, खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी, महाद्वार रोड, जोतिबा रोडवरील व्यापार्यांची भेट घेतली. त्यातून स्वदेशी वस्तू वापराचे महत्व पटवून देण्यात आले. पी कुमार, रोहीणी, फे्रेंडशिप, पुष्पम, गोखले ब्रदर्स, अंबा कटपीस सेंटर, करवीर क्रिएशन, कलकत्ता मॅचिंग सेंटर, प्रवासी बॅग यासह विविध दुकानदार, फेरीवाले, विक्रेते यांची खासदार महाडिक यांनी भेट घेतली. प्रत्येकांना गुलाबाचे फुल आणि मोदींची प्रतिमा असणारे स्वदेशी वापराचे फलक खासदार महाडिक यांच्या हस्ते देण्यात आले. व्यापार्यांनीसुध्दा मोदी यांच्या अभियानाची प्रशंसा करत, स्वदेशी वस्तूंचा वापर आणि खरेदी-विक्रीचा संकल्प व्यक्त केला. आत्मनिर्भर भारत, स्वदेशी अभियान या संकल्पनेचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. त्यामुळं हे अभियान देशभर यशस्वी होईल आणि भारत आर्थिकदृष्टया अधिक समृध्द होईल, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला आहे. काही मध्यमवर्गीय ग्राहक अजुनही परदेशी बनावटीच्या वस्तू ऑनलाईन खरेदी करतात. पण आता स्वदेशी वस्तू सुध्दा ऑनलाईन माध्यमातून विकल्या जाव्यात, यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करणार असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले. केंद्र सरकारने केलेल्या जीएसटी कर कपातीमुळे, देशभरातील ग्राहक आणि व्यापारी यांना मोठा दिलासा मिळाला असून, सणासुदीच्या काळात मोदी सरकारने दिलेली भेट अनमोल असल्याचे खासदार महाडिक यांनी नमुद केले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष विजय देसाई, महेश जाधव, अशोक देसाई, संगीता खाडे, किरण नकाते, माधुरी नकाते, राहुल चिकोडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar