रत्नागिरी, 26 सप्टेंबर, (हिं. स.) : दरवर्षीप्रमाणे यंदाही २७ सप्टेंबर रोजी शनिवारी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत जागतिक पर्यटन दिन राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी युनायटेड नेशन ट्युरिझमद्वारे घोषित करण्यात आलेल्या “पर्यटन आणि शाश्वत परिवर्तन“ या घोषवाक्याशी अधीन राहून पर्यटनाशी संबंधित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली आहे.
महामंडळाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित केलेल्या सर्व उपक्रमांमध्ये भाग घेऊन पर्यटनाचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
पर्यटन आणि शाश्वत परिवर्तन या संकल्पनेवर आधारित विशेष परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रात शाश्वत आणि जबाबदार पर्यटनाचा संदेश देण्याचा व महाराष्ट्राच्या पर्यटनदृष्ट्या संपन्नता दाखविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. तसेच महाराष्ट्रातील पर्यटनसंपन्नता अधोरेखित करण्यासाठी ई-ब्रोशर प्रकाशन व थीम बॅनर अनावरणही करण्यात येणार आहे. नागरिकांसाठी ‘वॉक उपक्रम’ तसेच विद्यार्थ्यांसाठी निबंध व चित्रकला स्पर्धा, सर्व पर्यटक निवास व उपाहारगृहांमध्ये विशेष कार्यक्रम व पारंपरिक खाद्यपदार्थांची मेजवानी, पर्यटकांसाठी नेचर वॉक, जंगल ट्रेल व अनुभवात्मक पर्यटन उपक्रम राबविण्यात येणार आहेत. जागतिक पर्यटन दिनाचा अधिकृत लोगो व थीम बॅनर्स सर्वत्र प्रदर्शनासाठी ठेवले जातील जे Rethink Tourism या महामंडळाच्या ध्येयाचे प्रतीक असणार आहेत.
प्रादेशिक कार्यालयामार्फंत जिल्ह्याच्या पालकमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना तसेच नामवंत व्यक्ती, पर्यटन तज्ज्ञ व टूर ऑपरेटर्स, सहल आयोजक, टूर्स असोसिएटस, हॉटेलियर्स, निवास न्याहरी इत्यादी पर्यटन व्यावसायिकांना निमंत्रित करून परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे. परिसंवादामध्ये यावर्षीच्या घोषवाक्यप्रमाणे कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली आहे. यासाठी पर्यटन व हॉटेल व्यावसायिक, पर्यटन उद्योजक, विद्यार्थी इत्यादींना निमंत्रित करण्यात येणार आहे. विभागातील महाविद्यालयांमध्ये पर्यटन आणि शाश्वत परिवर्तन या विषयावर प्रादेशिक व्यवस्थापक अथवा तज्ज्ञ व्यक्तींचे व्याख्यान ठेवण्यात येणार आहे. यावेळी एमटीडीसीच्या पर्यटक निवासांच्या डिजिटल – माहितीपत्रकोच विमोचन या परिसंवादामध्ये मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल समन्वय करीत असून पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे, व्यवस्थापकीय संचालक नीलेश गठणे मार्गदर्शन करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी