परभणी : शिंगणापूर ग्रामस्थांचा पंढरपूरकडे मोर्चा; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विठूरायाला साकडे
परभणी, 26 सप्टेंबर, (हिं.स.)। शेतकऱ्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना, शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या हेतूने शिंगणापूरचे सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पांडुरंग बाळासाहेब खिल्लारे यांच्या संकल्पनेतून शिंगणापूर येथील ग्
शिंगणापूर ग्रामस्थांचा पंढरपूरकडे मोर्चा


परभणी, 26 सप्टेंबर, (हिं.स.)। शेतकऱ्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना, शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या हेतूने शिंगणापूरचे सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पांडुरंग बाळासाहेब खिल्लारे यांच्या संकल्पनेतून शिंगणापूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने पंढरपूरकडे रवाना झाले. अंदाजे ५० गाड्यांमधून सुमारे दोन हजार ग्रामस्थ विठ्ठलाच्या चरणी साकडे घालण्यासाठी निघाले आहेत.

ग्रामस्थांचा हा मोर्चा “मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी दे पांडुरंग” या घोषणांनी गाजत आहे. शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीकरण आणि तात्काळ आर्थिक मदत मिळावी, यासाठी विठूरायाच्या चरणी साकडे घालून शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

सततच्या अतिवृष्टी, ढगफुटी व पिकांच्या झालेल्या मोठ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी काही ठोस मागण्या केल्या आहेत यात शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची तात्काळ मदत जाहीर करावी., शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा., अपूर्ण व अन्यायकारक ठरत असलेली कर्जमाफी योजना सर्व शेतकऱ्यांसाठी प्रभावीपणे लागू करावी आदी मागण्या करण्यात आल्या.

या संदर्भात सरपंच पांडुरंग बाळासाहेब खिल्लारे म्हणाले, अस्मानी-सुलतानी संकटांमुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे. शासनाकडून योग्य तो दिलासा मिळणे अपेक्षित असताना सतत दुर्लक्ष होत असल्याने आम्ही पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी साकडे घालतो आहोत. शेतकऱ्यांचा प्रश्न हा केवळ राजकीय नाही तर समाजाच्या अस्तित्वाशी निगडित आहे. शासनाने तात्काळ ठोस निर्णय घेतला पाहिजे.

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सिंगणापूरच्या ग्रामस्थांनी हाक दिल्याने या मोर्चाकडे संपूर्ण जिल्ह्यातून उत्सुकतेने पाहिले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande