सोलापूर, 26 सप्टेंबर (हिं.स.)।
सोलापूरचा ऐतिहासिक वारसा असलेल्या भुईकोट किल्ल्यातील प्रसिद्ध ''बाळंतीण विहिरी''जवळची तटबंदी पावसाच्या पाण्याने फुगल्याने ढासळली. किल्ला पाहण्यासाठी आलेल्या योगिनाथ फुलारींच्या निदर्शनास ही घटना आली. या घटनेमुळे किल्ल्याच्या सुरक्षिततेवर आणि संरक्षणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.किल्ला भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारीत येतो. सध्या काही भागात डागडुजीचे काम सुरू असले तरी इतर अनेक ठिकाणी किल्ल्याचा भाग जीर्ण झाला आहे. त्याची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. अनेक वर्षांपासून ही तटबंदी फुगल्याचे याठिकाणी येणाऱ्या नागरिकांनी सांगितले. किल्ल्यातील बाळंतीण विहिरीच्या बाजूची तटबंदी सुमारे १५ ते २० फूट लांबीची असून, तिचा काही भाग मोठ्या प्रमाणात कोसळला आहे. हा भाग बराच जुना असल्याने आणि नैसर्गिक झीज तसेच पावसाच्या पाण्यामुळे कमकुवत झाली असण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सोलापूर परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे तटबंदीला तडे गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड