नंदुरबार,, 26 सप्टेंबर (हिं.स.) नंदुरबार जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे. या निवडणुकीसाठी 01 जुलै, 2025 ही तारीख अधिसूचित करण्यात आली आहे. या तारखेस अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादी संबंधित निवडणूक विभाग/निर्वाचक गणांमध्ये विभागून, त्यानुसार निवडणूक विभाग/निर्वाचक गणनिहाय मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे टप्पे: प्रारूप मतदार यादीचे प्रकाशन: संबंधित निवडणूक विभाग/निर्वाचक गणातील मतदारांच्या माहितीसाठी 08 ऑक्टोंबर, 2025 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हरकती व सूचना मांडण्याचा कालावधी: विधानसभा मतदार यादीवरुन मतदार यादी तयार करताना काही चूका राहिल्यास, त्यासंदर्भात 08 ऑक्टोंबर ते 14 ऑक्टोंबर, 2025 पर्यंत संबंधितांकडून हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. अंतिम मतदार यादीचे प्रकाशन: प्राप्त हरकती व सूचना विचारात घेऊन, अधिसूचित केलेल्या तारखेस 27 ऑक्टोंबर, 2025 रोजी विधानसभा मतदार याद्यांवरून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या अंतिम व अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत nandurbar.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून मतदारांनी या संकेतस्थळाचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर करावा. मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमाची माहिती नागरिकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, तहसिल कार्यालय व पंचायत समिती कार्यालयांच्या सूचनाफलकावर, स्थानिक वृत्तपत्रामध्ये आणि स्थानिक केबल टी.व्ही. वर व्यापक प्रमाणावर प्रसिद्ध केली जाईल. असेही जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर