पुणे, 26 सप्टेंबर, (हिं.स.)। राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्यातील सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचे ठरविले आहे. त्याबाबत महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या वतीने सप्टेंबरच्या होणाऱ्या वेतनातून एक दिवसाचे वेतन कपात करून घेण्याची विनंती राज्य सरकारला निवेदनाद्वारे केली आहे.
संघटनेच्या वतीने कृषिमंत्री तसेच कृषी आयुक्तांना पत्र पाठवून वेतन कपात करून घेण्यास विनंती केली आहे.कर्मचारी म्हणून केवळ प्रशासकीय जबाबदारी पार पाडणे पुरेसे नाही, तर शेतकऱ्यांच्या दुःखात खऱ्या अर्थाने सहभागी होणे हीही आमची नैतिक जबाबदारी आहे. महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून आम्ही हे एक दिवसाचे वेतन आम्ही देत आहोत. असे सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेचे अध्यक्ष विलास रिंढे यांनी सांगितले .
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु