रायगड, 27 सप्टेंबर (हिं.स.)।
जनता शिक्षण मंडळाच्या ॲड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ, अलिबाग या प्रतिष्ठित महाविद्यालयाने आपल्या २५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीनिमित्त ‘विधिमंथन २०२५’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त झालेला कार्यक्रम जयवंत केळुसकर सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन रायगडचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. राजेंद्र सावंत यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या भाषणात कायद्याचे मूलभूत तत्व हेच संविधान आणि न्यायव्यवस्थेचा पाया असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना अभ्यास, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी अलिबाग आणि महाविद्यालयाशी असलेले भावनिक नातेही उलगडले.
प्रमुख पाहुण्या चित्रलेखा पाटील यांनी विद्यार्थ्यांना कायदेशीर शिक्षणाबरोबरच समाजाशी नाते टिकवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. राज्यशास्त्र अभ्यासक डॉ. अविनाश कोल्हे यांनी कायदा आणि समाज यामधील परस्पर संबंधावर मार्मिक विचार मांडले.यावेळी महाविद्यालयाच्या यूट्यूब चॅनलचे उद्घाटन, माहितीपट सादरीकरण आणि ‘न्याय मंथन’ अभिरूप न्यायालय स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, उपाध्यक्ष डॉ. साक्षी पाटील, संचालक मा. संजय पाटील आदी मान्यवरांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. संजय पाटील यांनी एक लाख एक हजार रुपयांची देणगी महाविद्यालयाच्या ग्रंथालयासाठी जाहीर केली. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. नीलम म्हात्रे, सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. डॉ. संदीप घाडगे यांनी केले. ‘विधिमंथन २०२५’ हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विधिक वाटचालीस प्रेरणादायी ठरला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके