नाशिक, 27 सप्टेंबर (हिं.स.)। आर्टिलरी सेंटर वडनेर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरात बिबट्या जेरबंद करण्यासाठी वनविभागाने आणि विविध बचाव पथकांनी मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेतली आहे. वडनेर दुमाला, पिंपळगाव खांब, विहितगाव व दाढेगाव परिसरात आतापर्यंत १८ पिंजरे, १५ ट्रॅप कॅमेरे आणि २ थर्मल ड्रोन तैनात करण्यात आले आहेत.
बिबट्याला सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यासाठी औषधे व अत्याधुनिक साधनसामग्रीसह दोन विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच संगमनेर रेस्क्यू टीमचे श्वानपथक, नाशिक वनपरिक्षेत्राचे बचाव पथक व टीम मिळून शोधमोहीम राबवत आहेत. परिसरात पिंजऱ्यांमध्ये भक्ष्य ठेवणे, वेळोवेळी पिंजऱ्यांची पाहणी, पाऊलखुणांच्या आधारे ट्रॅप कॅमेरे बसवणे तसेच आर्टिलरी सेंटर आणि आसपासच्या गावात जनजागृती गस्त अशा विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. या मोहिमेत नाशिक वनपरिक्षेत्र वन्यप्राणी बचाव पथक, रेस्क्यू नाशिक डिव्हिजन, संगमनेर रेस्क्यू टीम, फिरते पथक (नाशिक, वणी) क्षेत्रीय कर्मचारी आणि आर्टिलरी सेंटर अधिकारी व जवान यांचा सक्रिय सहभाग असून एकूण ९० अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत कार्यरत आहेत.मुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन व उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात असून सहाय्यक वनसंरक्षक प्रशांत खैरनार व वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ क्षेत्रीय स्तरावर नियोजन व देखरेख करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV