परभणी, 27 सप्टेंबर (हिं.स.)।
सेलू तालुक्यातील चिकलठाणा बू येथील झोपडपट्टी परिसरात ओढ्याचे पाणी शिरल्यामुळे नागरिकांचा बाहेरील संपर्क पूर्णपणे तुटला आहे. परिणामी शाळकरी विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणारा हा प्रश्न अजूनही न सुटल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी ओढ्याचा प्रवाह वस्तीच्या बाहेरून जात होता. मात्र, अलीकडेच पाणी थेट वस्तीमधून वळवल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. पावसाळ्यात पूल नसल्याने विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून नाल्यावरून रस्ता पार करावा लागतो. यामुळे त्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होत असून पालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
नागरिकांनी सांगितले की, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वर्षानुवर्षे हा प्रश्न प्रलंबित आहे. पावसाळ्यात वाहतूक थांबते, तर ओढा ओलांडताना मोठा अपघात होण्याची शक्यता कायम राहते. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चिकलठाणा बू येथील नागरिकांनी प्रशासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत, कायमस्वरूपी मोठा पूल बांधावा – जेणेकरून पावसाळ्यातही वाहतूक सुरळीत राहील. ओढ्याचा प्रवाह पूर्ववत करावा – वस्तीमधून वळवलेला पाण्याचा मार्ग सुरक्षितरीत्या बाहेर नेण्यात यावा. तात्पुरत्या सुविधा उभाराव्यात – पावसाळ्यात नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा यासाठी तातडीचे पर्याय उपलब्ध करावेत. प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे – वारंवार दुर्लक्ष न करता प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन उपाययोजना कराव्यात. विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित मार्ग तयार करावा – शिक्षणात खंड पडू नये म्हणून विशेष व्यवस्था करावी. आदि मागण्या करण्यात आल्या आहेत.
“प्रशासन वारंवार आश्वासने देते, पण प्रत्यक्षात काहीच होत नाही. पावसाळा आला की आमचे हाल सुरू होतात. मुलांचे शिक्षण, नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. तात्काळ मोठा पूल उभारला नाही तर आम्ही तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंब करू,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis