मुंबई, 27 सप्टेंबर (हिं.स.)। जागतिक पर्यटन दिन 2025 च्या निमित्ताने, इंडिया टुरिझम मुंबईच्या वतीने आज मुंबईतील दादर चौपाटी इथे केंद्र सरकारच्या स्वच्छता ही सेवा या अभियानाला अनुसरून, एका स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अखत्यारीतील युवा व्यवहार विभाग, पत्र सूचना कार्यालय, दादर इथली हॉटेल व्यवस्थापन संस्था आणि प्रादेशिक पर्यटक व्यावसायिक संघटनेच्या सहकार्याने या मोहीमेचे आयोजन केले गेले.
या मोहिमेत इंडिया टुरिझम मुंबई, पत्र सूचना कार्यालय प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो चे अधिकारी, दादर इथल्या हॉटेल व्यवस्थापन संस्थेचे विद्यार्थी आणि कर्मचारी, युवा व्यवहार विभागाचे प्रतिनिधी, अप्रादेशिक पर्यटक व्यावसायिक संघटनेचे सदस्य आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रतिनिधी असे सुमारे 60 जण या मोहिमेत सहभागी झाले होते.
यावेळी इंडिया टुरिझमचे (पश्चिम आणि मध्य) क्षेत्रिय संचालक मोहम्मद फारूक यांनी सहभागींशी संवाद साधला. आपल्या संवादातून त्यांनी स्वच्छतेचे महत्त्व आणि उत्तरदायी पर्यटन पद्धतींविषयी मार्गदर्शन केले. पर्यटन आणि शाश्वत परिवर्तन या यंदाच्या जागतिक पर्यटन दिनाची या वर्षाची संकल्पनेतून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी अधोरेखित होते असे ते म्हणाले. प्रत्येकाने जबाबदारीपूर्वक प्रवास करावा आणि शाश्वततेसाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. जर का पर्यटनाला पर्यावरणाच्या संरक्षणासाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांमधील सक्रिय सहभागाची जोड देता आली, तरच पर्यटन क्षेत्रातील परिवर्तनाला अर्थ मिळू शकतो असे ते म्हणाले.
जागतिक पर्यटन दिनाच्या जागतिक संकल्पनेला अनुसरून स्वच्छता आणि उत्तरदायी पर्यटन पद्धतींना प्रोत्साहन देणे, हा या स्वच्छा उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या उपक्रमाच्या निमित्ताने समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेसोबतच, सहभागी झालेल्या प्रतिनिधींमध्ये पर्यावरणीय व्यवस्थापन, जबाबदारीने उत्सव साजरे करणे आणि कृतीशील नागरिक यासंबंधीची मूल्ये रुजवण्याचा प्रयत्नही केला गेला. त्याच अनुषंगाने या उपक्रमात सहभागी झालेल्यांमध्ये स्वच्छ भारत मिशयानाशी जोडलेल्या आदर्श मूल्यांप्रती वचनबद्धता रुजावी या उद्देशाने त्यांना स्वच्छता विषयक शपथही दिली गेली.
दादर चौपाटी इथे पार पडलेल्या स्वच्छता मोहिमेत अधिकारी, स्वयंसेवक, विद्यार्थी आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधीत भागधारकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. यासोबतच त्यांच्या कृतीतन स्वच्छतेसाठीची वचनबद्धताही दिसून येत होती. या सामूहिक प्रयत्नामधून सहभागींमध्ये स्वच्छ भारताचे राष्ट्रीय ध्येय साध्य करण्याप्रती दृढ निर्धारही दिसून आला, तसेच स्वच्छ आणि शाश्वत पर्यावरण राखण्यासाठी परस्पर सामायिक समर्पणाचेही दर्शन घडले. हा कार्यक्रम सामुदायिक सहभागातून आखलेल्या उपक्रमांचा प्रभाव आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी परस्पर सहकार्याने केलेल्या प्रयत्नांचे महत्व अधोरेखित करणारा सर्वोत्तम उदाहरणच ठरला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule