अमरावती, 27 सप्टेंबर (हिं.स.) : अमरावती शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाची बांधिलकी आहे. येथील विकासकामांना गती देवून रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज व इतर मूलभूत सुविधा प्राधान्याने पूर्ण करा. स्वच्छता मोहिम बळकट करा. संबंधित कामे वेळेत, गतीने व पारदर्शकतेने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी आज महापालिकेचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ.अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके, आमदार रवि राणा, आमदार राजेश वानखडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक तसेच संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. स्वच्छ भारत अभियानांतर्गत नियमित स्वच्छता, कचरा संकलन व विलगीकरण काटेकोरपणे व्हावे. शहरात पायाभूत सुविधा, रस्ते दुरुस्ती, स्वच्छता मोहिम, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, अतिक्रमण निर्मूलन या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित महत्त्वाच्या सुविधा आहेत. ही कामे वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने व्हावीत. पाणीटंचाईवर उपाययोजना तसेच जलस्रोत व्यवस्थापन, पाइपलाइन दुरुस्ती व टंचाईग्रस्त भागात तातडीने उपाय राबवा. नागरिक तक्रार निवारण तसेच डिजिटल तक्रार प्रणाली प्रभावीपणे राबवा व तक्रारींना त्वरित प्रतिसाद द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अमरावती हे आपले शहर आहे. स्वच्छता, पाणीबचत, हरित उपक्रम, अतिक्रमणमुक्ती आणि कायदा सुव्यवस्थेत नागरिकांचा सक्रीय सहभाग मिळाला, तर विकासकामांना गती मिळेल,असे ते यावेळी म्हणाले. शहरातील नागरिकांना अधिक सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेतर्फे नवनवीन उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या उपक्रमांचे उद्घाटन पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. ई-गव्हर्नन्स उपक्रम -केंद्रीकृत नागरिक डॅशबोर्ड, ब्लॉकचेनचा वापर, कामगार प्रमाणपत्रांसाठी वेब पोर्टल याचे उद्घाटन करण्यात आले. तसेच 'महापालिका संदेशिनी ' न्यूज पोर्टल यासह अमरावती शहर कूल रूफ नियमावली -2025 चे उद्घाटन करण्यात आले. तसेच शहरी आरोग्य वेलनेस केंद्राचे ऑनलाइन लोकार्पण यावेळी करण्यात आले. महानगरपालिकेच्या या विविध उपक्रमांमुळे शहराच्या विकासाला चालना मिळून नागरिकांना सोयीसुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध होणार आहेत. हे उपक्रम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना जलद, पारदर्शक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध होणार आहे. माहिती तंत्रज्ञान, ब्लॉकचेन, केंद्रीकृत नागरिक डॅशबोर्ड यांसारख्या उपक्रमांमुळे नागरिकांना घरबसल्या आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत. ‘कूल रूफ नियमावली 2025’ हा उपक्रम शहराच्या पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. या नियमावलीमुळे उष्णतेची तीव्रता कमी होईल तसेच आरोग्यदायी वातावरणाची निर्मिती होईल. शहरी आरोग्य वेलनेस केंद्रांचे नूतनीकरण नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक असून, यामुळे आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि वेळेवर उपलब्ध होणार आहे. बैठकीत आमदार संजय खोडके व आमदार सुलभा खोडके यांनी प्रत्यक्ष भाड्यावर कर आकारणी 56 टक्के असून ती जास्त असून कमी करण्यासाठी यावेळी मागणी केली. यावर पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी त्वरीत कर आकारणी कमी करण्याच्या सूचना महानगरपालिका आयुक्त श्रीमती शर्मा यांना दिल्या. यावेळी अंबा नाला गाळ काढणे, अंबादेवी व एकवीरा देवी मंदिराला ब-श्रेणी तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवणे, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, स्मार्ट स्ट्रीट लाईट प्रणाली, पीएम ई -बस सेवा, छत्री तलाव परिसर सौंदर्यीकरण, जवाहर गेट जतन, मनपाची नवीन प्रशासकीय इमारत, शाळा व मॉडेल यूपीएचसी उभारणी, दिव्यांग भवन, शिवसृष्टी प्रकल्प, रमाई आवास योजना, भुयारी गटार योजना, चौक सौंदर्यीकरण, महात्मा फुले संकुल, नेहरू मैदान टाऊन हॉल इमारत या विषयांवर चर्चा झाली. या विकास कामांसाठी शासनाकडून आवश्यक मंजुरी त्वरीत देण्यात येईल.या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करण्याचे आदेश पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी