छत्रपती संभाजीनगर, 27 सप्टेंबर (हिं.स.)।महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीआज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या ढोरकीन आणि टाकळी फाटा या भागात खा. कल्याण काळे यांचे समवेत नुकसानीची पाहणी केली.
नुकसान ही नंतर माध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले की,शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांची खचलेली मनस्थिती क्षणाक्षणाला जाणवत होती.अतिवृष्टीमुळे नुसती शेती खचलेली नाही, महाराष्ट्रातला शेतकरी खचला आहे. हे संकट महाभयानक आहे. कुठे उभे पीक पाण्याखाली गेले, कुठे जमीन वाहून गेली, कुठे खडक उघडा पडलाय तर काही ठिकाणी अक्षरशः सोन्यासारख्या पिकांची राखरांगोळी झाली. शासनाने आता कुठलेही कागदी घोडे नाचवू नये, नियम आणि अटी टाकून शेतकऱ्याला खेळवू नये. असेही ते म्हणाले आहेत.
शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही आता आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. मी शासनाला विनंती करतो, वेळ न दवडता तातडीने भरघोस मदत जाहीर करा, पंचनाम्यांना गती द्या आणि आता तरी शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीची घोषणा करा. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, युसूफ शेख, रवींद्र काळे, विनोद तांबे, भाऊसाहेब जगताप, अशोक डोळस, रावसाहेब नाडे, संभाजी काटे, रविंद्र आमले आदींसह विविध पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis