रत्नागिरी, 27 सप्टेंबर, (हिं. स.) : असोसिएशन ऑफ कोलन अँड रेक्टल सर्जन ऑफ इंडिया (ACRSI) या संस्थेकडून अत्यंत मानाची एफएसीआरएसआय (FACRSI)ही फेलोशिप डॉ. सुश्रुत प्रमोद तेंडुलकर यांनी भारतात प्रथम क्रमांक आणि सुवर्णपदकासह पटकावली.
ही परीक्षा एप्रिलमध्ये घेण्यात आली होती. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला असून डॉ. तेंडुलकर यांनी प्रथम क्रमांकासह रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. डॉ. सुश्रुत जनरल सर्जन असून त्यांचे शिक्षण मुंबईत झाले आहे. त्यांनी मुंबईच्या कुपर वैद्यकीय महाविद्यालयात सर्जन म्हणून व कळवा येथील राजीव गांधी शासकीय महाविद्यालयात असिस्टंट प्रोफेसर व सर्जन, तसेच रत्नागिरी शासकीय महाविद्यालयातही सर्जन म्हणून काम पाहिले आहे.
कॉम्प्लेक्स फिस्चुला, पाइल्स, पायलोनिडल सायनस यांसारख्या आजारावरील उपचारात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. तसेच इन्फल्मेटरी बॉवेल डिसीज, मोठ्या आतड्याचा कॅन्सर यांसारख्या गुंतागुंतीच्या रोगाचे दुर्बिणीतून निदान (कोलॉनोस्कोपी) व उपचारात, शस्त्रक्रियेत त्यांनी प्रावीण्य मिळवले आहे.
डॉ. तेंडुलकर यांच्या यशाबद्दल वडील डॉ. प्रमोद तेंडुलकर, तसेच रत्नागिरीतील तज्ज्ञ डॉक्टरांनी अभिनंदन केले. डॉ. तेंडुलकर सध्या डॉ. गोंधळेकर क्लिनिक येथे स्वतंत्र प्रॅक्टिस करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी