नाशिक, 27 सप्टेंबर, (हिं.स.) : जीएसटी सुधारणांचा लाभ उद्योजकांबरोबर सर्वच घटकांना होणार असल्याची माहिती सीजीएसटीचे नाशिक आयुक्त कृष्णकुमार श्रीवास्तव यांनी दिली. जीएसटी सुधारणांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवाकर (सीजीएसटी) आयुक्तालय आणि अंबड इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) यांच्या संयुक्त विद्यमाने करदाते, व्यापारी संघटना आणि कर व्यवसायी संघटनांसाठी आयोजित परिसंवादात मार्गदर्शन करताना श्रीवास्तव बोलत होते. व्यासपीठावर सीजीएसटीचे अतिरिक्त आयुक्त अजित दान, सहायक आयुक्त जगदीश डोड्डी, आयमाचे अध्यक्ष ललित बूब, सरचिटणीस प्रमोद वाघ आदी होते.
श्रीवास्तव यांनी आपल्या भाषणात जीएसटी अनुपालन सुलभ करण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकला. जीएसटी दरकपातीचे फायदे अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही त्यांनी केले. या सुधारणांबद्दल उपस्थितांना माहिती होण्यासाठी सहआयुक्त जगदीश डोड्डी यांनी याबाबत सविस्तर सादरीकरण केले. उपस्थितांनी विचारलेल्या विविध शंकांचे निरसन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV