सततच्या पावसामुळे भाज्यांची आवक मंदावली
अमरावती, 27 सप्टेंबर (हिं.स.) : पालेभाज्यांना जास्त प्रमाणात ऊन, पाऊस सहन होत नाही. त्यामुळे त्यांची विक्रेते विशेष काळजी घेत असतात. परंतु, यंदा सतत पाऊस सुरू असल्यामुळे ऐन उत्सवाच्या काळात उत्तम दर्जाच्या पालेभाज्या भाजीबाजारात मिळणे कठीण झाले आहे.
सततच्या पावसामुळे भाजी बाजार मध्ये भाज्यांची आवक मंदावली पालेभाज्या 100 ते 160 रुपये प्रती किलोवर:


अमरावती, 27 सप्टेंबर (हिं.स.) : पालेभाज्यांना जास्त प्रमाणात ऊन, पाऊस सहन होत नाही. त्यामुळे त्यांची विक्रेते विशेष काळजी घेत असतात. परंतु, यंदा सतत पाऊस सुरू असल्यामुळे ऐन उत्सवाच्या काळात उत्तम दर्जाच्या पालेभाज्या भाजीबाजारात मिळणे कठीण झाले आहे.

पावसाचा मार बसल्यामुळे शेतात पालेभाज्या मान टाकत आहेत. त्यामुळे ज्या पालेभाज्या काहीशा सुस्थितीत असतात त्या बाजारात विक्रीसाठी आणल्या जात असून त्यांचाही दर्जा हा फारसा चांगला नसतो. तरीही पालक, कोथिंबिर, मेथी, आंबटचुका, चवळी, शेपू, लाल माठ, अंबाडी या भाज्यांची किंमत १०० ते १६० रुपये किलोवर पोहोचली आहे. एखादवेळी भाजीचा दर्जा उत्तम असेल तर १७० रु. किलोपर्यंत भाव वाढत आहेत.

सध्या सण-उत्सव सुरू असून मोठ्या मंदिरांमध्ये दररोज भाविकांना महाप्रसाद दिला जातो. त्यासाठी दररोज कोथिंबिर, काही पालेभाज्यांची आवश्यकता असते. त्यामुळे पालेभाज्यांना सध्या मागणी वाढली आहे. पालक, आंबटचुका, अंबाडी, मेथी, चवळी या भाज्या देवीला सकाळी नैवेद्यासाठी लागतात. मात्र, सतत सुरू असलेल्या पावसामुळे उत्तम दर्जाच्या पालेभाज्या मिळेनाशा झाल्या आहेत. ठोक बाजारातील आवकही कमी झाली आहे. कोथिंबीर खुडल्यासारखी, काहीशी पिवळट मिळत आहे. त्यातच हिरवी कोथिंबीर मात्र भाव खाऊन जात आहे. हीच स्थिती इतर पालेभाज्यांची आहे. पालक, कोथिंबीर ही बारमाही मिळते परंतु आंबटचुका, मेथी, लाल माठ, शेपू, चवळी, अंबाडी या पालेभाज्या साधारणत: सप्टेंबर, ऑक्टोबरपासून मिळण्यास सुरुवात होते. त्यामुळे या नुकत्याच बाजारात आल्या आहेत. त्यांनाही पावसाचा तडाखा बसल्यामुळे ज्या भाज्या काहीशा सुस्थितीत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होत आहेत, त्यांचे भाव वाढले आहेत, अशी माहिती पालेभाज्यांविक्रेत्यांनी दिली .

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande